लखनौ: हाथरस अत्याचार प्रकरणाचे (Hathras Case) वार्तांकन करायला गेलेले केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन (Kerala journalist Siddique Kappan) यांची अखेर दोन वर्षानंतर उत्तर प्रदेशच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. सिद्दीकी कप्पन यांना आधी पोलिसांनी दहशतवादी कारवाई विरोधी कायदा असलेल्या UAPA अंतर्गत अटक केली होती. त्यानंतर ईडीने त्यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा आरोप ठेवला होता. आता त्या प्रकरणात सिद्दीकी कप्पन यांची सुटका झाली आहे.
UAPA कायद्यांतर्गत सिद्दीकी यांना या सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर (Siddique Kappan Bail) केला होता. पण ईडीने (Enforcement Directorate) त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने आता त्यांची सुटका केली आहे.
हाथरस येथे 2020 साली एका 19 वर्षीय दलित मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला होता. या घटनेचे वार्तांकन करायला गेलेल्या सिद्दीकी कप्पन यांच्यावर नागरिकांना भडकवण्यासह इतर आरोप ठेवण्यात आले होते. त्यांना दहशतवादी विरोधी कायद्यांतर्गत म्हणजे UAPA अंतर्गत अटक करण्यात आली होती. तसचे ईडीने त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचे ही आरोप ठेवले होते.
सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सिद्दीकी कप्पन यांना जामीन मंजूर केला होता. पण ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ते तुरुंगातच होते. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने सिद्दीकी कप्पन यांची सुटका केली आहे.
Hathras Case: काय आहे संपूर्ण प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हातील एका गावात 14 सप्टेंबर 2020 रोजी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. घटनेनंतर पीडितेला अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती खालावल्यानंतर तिला उपचारासाठी दिल्लीत आणले होते. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या युवतीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर येताच देशभरात संतापाची लाट उसळली होती. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या मृतदेहावर कुटुंबावर दबाव टाकून बळजबरीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप झाला. पीडितेच्या घरी जाणारे मार्ग पोलिसांनी अडवले होते.
या घटनेच्या वृत्तांकनासाठी देशभरातील पत्रकार हाथरसमध्ये दाखल होऊ लागले होते. त्यात सिद्दीकी कप्पन यांचाही समावेश होता. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक करत UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.