Army Truck Accident: उत्तर सिक्कीममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या भागात लष्कराच्या ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये 16 जवानांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार जवानही जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, 23 डिसेंबर 2022 रोजी उत्तर सिक्कीममधील जेमा येथे लष्कराच्या ट्रकला अपघात झाला. या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे.
लष्कराने सांगितले की, अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्यातील एक होते. जे सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर वाहन घसरले आणि खाली दरीत कोसळले. अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आणि चार जखमी जवानांना विमानाने उपचारासाठी हलवण्यात आले.
3 जेसीओसह 16 जवान शहीद झाले
या दुर्घटनेत दुर्दैवाने तीन कनिष्ठ अधिकारी आणि 13 जवान शहीद झाल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकूल कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे, असंही लष्करानं म्हटलं आहे. उत्तर सिक्कीम हा अतिशय धोकादायक भाग आहे. हा भाग सध्या पूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे.
पंतप्रधान मोदींसह बड्या नेत्यांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान मोदींसह देशातील बड्या नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ही धक्कादायक बातमी ऐकून खूप दु:ख झाले. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांना आदरांजली, असं मोदींनी म्हटलं आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ही खूपच दुर्देवी घटना आहे. वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. घटनेतील जखमींना चांगल्यात चांगले उपचार देण्याच्या सूचना देखील शाह यांनी दिल्या आहेत.
संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले आहे. राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना बलिदानामुळं खूप दुःख झाले आहे. देश त्यांच्या सेवा आणि कर्तव्याबद्दल त्यांच्याप्रति कृतज्ञ आहे. जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे होण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करतो आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. वीर जवानांच्या बलिदानानं देशाची मोठी हानी झाली आहे, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.