Shraddha Murder Case: आफताब पूनावाला कुटुंबिय कुठे गायब झाले असा प्रश्न निर्माण झालाय. श्रद्धा वालकर खून प्रकरण उघड झाल्यानंतर आफताब कुटुंबाने वसईतील फ्लॅट सोडला असून ते मीरा रोडला शिफ्ट झालेत अशी चर्चा आहे. स्थानिक पोलीसही आफताबच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत. आफताब कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न फैसल करतोय. या प्रकरणात आफताब कुटुंबाचाही सहभाग असल्याचा दावा श्रद्धाच्या वडिलांनी केलाय. 


मुंबईतल्या वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आणि आता थेट श्रद्धाच्या वडिलांनीच आफताबच्या कुटुंबावर गंभीर आरोप केलाय. श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताबचं कुटुंबही असल्याचा आरोप त्यांनी केला. एबीपी माझाला फोनवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत श्रद्धाच्या वडिलांनी गौप्यस्फोट केलाय. ऑगस्ट 2019 मध्ये श्रद्धा आणि आफताबच्या लग्नाची चर्चा करण्यासाठी आफताब कुटुंबाला भेटायला गेले होते. मात्र आफताबचा चुलत भाऊ यांनी पुन्हा कधीही दारात येऊ नका असे म्हणत आमचा अपमान केला. आफताब ला त्यांचा सपोर्ट होता आणि त्यांनी प्रवृत्त केला असे दिसून येतंय. आफताबच्या कुटुंबियांकडून येणारा नकार आणि पदरी पडणारा अपमान तिच्या वडिलांना सहन झाला नाही. त्यांनी श्रद्धाला आफताबचा नाद सोडण्याचा सल्ला दिला. आम्ही श्रद्धाला आफताबला सोडण्यासाठी अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नव्हती. आम्ही आमच्या नातेवाईकांना तिचे समुपदेशन करायला सांगितले पण ती कोणाचेही ऐकायला तयार नव्हती, असे वडिलांनी सांगितलं.


अफताबविरोधात श्रद्धानं पोलिसात केली होती तक्रार -
दिल्ली पोलिसांनी वसईत येऊन अनेकांचे जबाब नोंदवले. त्यातला एक जबाब होता गॉडविनचा. आफताबने श्रद्धाला मारहाण केली तेव्हा श्रद्धाच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून गॉडवीन तिचा मदतीला आला होता. श्रद्धावर उपचार केले आणि पोलिसांत तक्रारही दाखल केली. 23 नोव्हेंबर 2020 मध्ये श्रद्धानं आफताबविरोधात तक्रार दाखल केली. आफताब गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिनं तक्रारीत म्हंटलं. पण 19 डिसेंबर 2020 मध्ये श्रद्धानं तक्रार मागे घेतली, असे गॉडविनने सांगितलं.  



आफताबच्या घराजवळचं सीसीटीव्ही -
श्रद्धा हत्याप्रकरणातील सर्व बारकावे पोलीस तपासत आहेत. आफताबच्या घराजवळचं सीसीटीव्ही हाती लागलं. हे सीसीटीव्ही फुटेज 18 ऑक्टोबरचं आहे. 18 ऑक्टोबरला मध्यरात्री आफताब एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तिनदा पिशवी आणि बॅग घेऊन घराबाहेर पडला. श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे फेकण्यासाठी आफताब घराबाहेर पडल्याची माहिती मिळतेय. 


श्रद्धाची हत्या झाली त्या दिवसापासूनचं प्रत्येक दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. श्रद्धाच्या हत्येचं रिक्रिएशन करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला त्याच्या फ्लॅटवर नेलं. यावेळी हत्येचं रिक्रिएशन करण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी आफताबचे आणि श्रद्धाचे कपडे जप्त केलेत. पण हत्येच्या वेळी आफताबने परिधान केलेले कपडे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. श्रद्धा हत्याप्रकरणात रोज येणारी नवी माहिती धडकी भरवणारी आहे. आफताबची नार्को टेस्ट पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आता या नार्को टेस्टमधून काय समोर येतंय हे पाहावं लागेल. 


आणखी वाचा :
Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येत आफताबच्या कुटुंबीयांचाही सहभाग; एबीपी माझाशी बोलताना श्रद्धाच्या वडिलांचा गंभीर आरोप