Shraddha Murder Case: देशभर खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात आरोपी आफताब पुनावाला (Aftab Punawala) याच्यावर आता आरोप निश्चित करण्यात आले आहेत. श्रद्धाची हत्या करुन पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप आफताबवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 1 जूनपासून दिल्लीच्या साकेत सत्र न्यायालयात सुरू होणार आहे. श्रद्धा वालकरच्या वडिलांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. 


आफताब पुनावालाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा आणि तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र आफताबने हे सर्व आरोप फेटाळून लावत खटल्याला सामोरे जाणार असल्याचं सांगितले. या प्रकरणाची सुनावणी दिल्लीच्या विशेष सत्र न्यायालयात 1 जून पासून सुरू होणार आहे. 


Shraddha Murder Case: त्याला फाशी झालीच पाहिजे...


या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाला फाशीची शिक्षा होईल, अशी आशा श्रद्धा वालकरच्या वडिलांनी, विकास वालकरांनी व्यक्त केली. श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले, आम्हाला वाटते आरोपीला फाशी द्यावी. मी न्यायालयाला विनंती करेन की लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करावी आणि आम्हाला न्याय द्यावा.


6,629 पानांचे आरोपपत्र दाखल


अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे) या गुन्ह्यासाठी प्रथम आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. दिल्ली पोलिसांनी 24 जानेवारी रोजी या प्रकरणी 6,629 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.


आफताब पूनावालाने गेल्या वर्षी 18 मे रोजी श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या घरी सुमारे तीन आठवडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. पकडले जाऊ नये म्हणून त्याने वालकरच्या शरीराचे अवयव दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले होते.


श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचं काही अवशेष आणि हाडे सापडली आहेत. ज्या रेफ्रिजरेटरमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवण्यात आले होते ते ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच श्रद्धा आणि आफताबचे काही कपडेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पण पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाचे शीर, खुनाचे शस्त्र, रक्ताने माखलेले कपडे सापडले नाहीत. या संबंधी कोणताही प्रत्यक्षदर्शी अद्याप समोर आला नाही. तसेच घटनेचे कोणताही व्हिडीओ फुटेज समोर आलेला नाही. 


ही बातमी वाचा: