Ayushman Bharat Scheme: आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजनेच्या अहवालात कॅगने (CAG) अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कॅगच्या या अहवालानुसार, जवळपास  7.5 लाख लाभार्थ्यांनी एकाच मोबाईल नंबरवरुन नोंदणी केल्याचं समोर आलं आहे. या मोबाईल क्रमांकाचे दहाच्या दहा अंक हे 9 आहेत. म्हणजेच हा मोबाईल क्रमांक (9999999999) असा आहे. लोकसभेत (Loksabha) सादर करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या लेखापरीक्षणाच्या अहवालात कॅगने ही धक्कादायक माहिती दिली आहे.


चुकीच्या मोबाईल क्रमांकवरुन झाली नोंदणी


विशेष बाब म्हणजे ज्या मोबाईल क्रमांकावरून सुमारे 7.5 लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तो मोबाईल क्रमांकही चुकीचा असल्याचं या अहवातून स्पष्ट झालं आहे. तसेच या मोबाईल क्रमांकाचे कोणतेही सिमकार्ड नसल्याचंही समोर आलं आहे.  BIS डेटाबेसच्या विश्लेषणात इतक्या मोठ्या प्रमाणावरील ही बनावट असल्याचं उघड झालं आहे. 


दरम्यान अशाच आणखी एका प्रकाराचा खुलासा देखील कॅगच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की,  सुमारे 1 लाख 39 हजार 300 लोकांनी 8888888888 या क्रमांवरुन नोंदणी केली आहे. तर 96,046 लोकांनी 90000000 या क्रमांकावरुन नोंदणी केली आहे. याशिवाय असे चुकीचे 20 क्रमांक देखील या अहवालातून समोर आले आहे. या क्रमांकावरुन जवळपास 10,000 ते 50,000 लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.


इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कॅगच्या अहवालात एकूण 7.87 कोटी लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केल्याचं समोर आलं आहे. ही आकडेवारी नोव्हेंबर 2022 पर्यंत या योजनेमध्ये 10.74 कोटी कुटुंबाना समाविष्ट करण्याच्या लक्ष्यच्या 73 टक्के आहे. 


मोबाईल क्रमांकाशिवाय माहिती मिळवण्यात अडचण


कोणत्याही लाभार्थ्याविषयी माहिती करुन घेण्यसाठी मोबाईल क्रमांक हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं या अहवालातून सांगण्यात आलं आहे. मोबाईल क्रमांकच चुकीचा असल्यास लाभार्थ्याची ओळख पटवणं देखील कठीण असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच यामुळे रुग्णालये यामुळे त्यांना सुविधा नाकारतील आणि  लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता देखील यामध्ये वर्तवण्यात आली आहे. 


नवीन यंत्रेमुळे चूक सुधारली जाईल का?


कॅगने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे की, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) या ऑडिटला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या समस्येचे लवकरच निवारण करण्यात येणार आहे. त्यासाठी BIS 2.0 ही कार्यप्रणाली तयार करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. यामुळे  एकाच मोबाईल नंबरवरुन ठराविक संख्येपेक्षा जास्त कुटुंबांची नोंदणी करता येणार नाही. तसेच कोणताही मोबाईल क्रमांक वापरुन या योजनेसाठी नोंदणी आता करता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


मोबाईल क्रमांकाबाबत 'या' आहेत तरतुदी


या अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यापासून त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा अशी तरतूद लाभार्थी मार्गदर्शक पुस्तिकामध्ये करण्यात आली आहे. तसेच लाभार्थ्यांला दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवून योग्य पडताळणी करण्यात येणार आहे. 


हेही वाचा : 


Wheat : मोदी सरकारच्या काळात देशात गहू खरेदीत 43 टक्क्यांची वाढ, कृषीमंत्री तोमर यांची माहिती