Sanjay Raut Arrest : राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या (Sanjay Raut Arrested) अटकेचे पडसाद संसदेत उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने राऊत यांना पाठिंबा दर्शवला आहे. लोकसभेत शिवसेनेसह काँग्रेसही अटकेच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले की, नियमानुसार संजय राऊत यांच्या अटकेबाबत स्थगन प्रस्तावाची नोटीस राज्यसभेत दिली आहे. भाजपच्या इशाऱ्यावर केंद्रीय यंत्रणा बेलगामपणे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केली आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे संसदेतील गटनेते, ज्येष्ठ खासदार आहेत. त्यांना संसदेचे अधिवेशन सुरू असताना अटक करण्यात आली आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर चौकशीसाठी बोलवा, मी येईन असं वारंवार ते सांगत होते. मग तरी ही घाई का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हा 'नवीन भारत' असल्याचे भाजपवाले सांगतात. पण नव्या भारतात कारवाई केवळ फक्त विरोधकांवर का होतात असा प्रश्नही प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. ईडी म्हणजे भाजपचे एक विस्तारीत अंग असल्याचा आरोप त्यांनी केला. हेमंत विश्व शर्मा भाजपमध्ये आले तर त्यांच्या विरोधातल्या सगळ्या ईडी कारवाया बंद झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांनादेखील ईडीने बोलावले. तर, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडीची कारवाई झाली. राजकीय हेतूने सुरू असलेल्या कारवाईविरोधात आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहिलो. त्यामुळे आता आमच्या पाठिशीदेखील सर्वजण उभे राहतील ही अपेक्षा असल्याचे प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले.
काँग्रेस राऊत यांच्या पाठिशी
काँग्रेसदेखील संजय राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी ट्विट करुन राऊत यांना पाठिंबा दर्शवला आहे. भाजपच्या दबावाच्या राजकारणापुढे न झुकल्याची शिक्षा राऊतांना मिळतेय असं चौधरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत हे धाडसी आणि धैर्यवान व्यक्ती असल्याचंही चौधरी यांनी म्हटलं आहे.