Sanjay Raut Arrest  : "संजय राऊत (Sanjay Raut) यांना बोगस केसमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात खोटे पुरावे जमा केले जात आहेत. शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं आणि शिवसेना संपवण्याचा हे प्लॅनिंग आहे. भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे," असा घणाघात संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी केला आहे. 


शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. काल  दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली.  


अटक करण्यासाठी पत्राचाळ प्रकरण पुढे
पत्रा चाळ आणि संजय राऊत यांचा काडीमात्र संबंध नाही, ती कुठे आहे हे संजय राऊत यांना माहित नाही. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु, असं सुनील राऊत म्हणाले.


50 लाखांचं ट्रान्झॅक्शन हे प्रवीण राऊत यांच्या पत्नीने दिलेले रिफंडेबल पैसे आहेत. दादरच्या फ्लॅटसाठी घेतलेलं कर्ज आहे. पैसे घ्यायचे असले तर कॅशने घेतले असते, ते चेक पेमेंट आहे, असं सुनील राऊत म्हणाले.


संजय राऊत झुकणार नाहीत
शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं आणि शिवसेना संपवण्याचा हे प्लॅनिंग आहे. परंतु यामुळे शिवसेनेचा आवाज दबणार नाही. संजय राऊत झुकणार नाहीत आणि शेवटपर्यंत शिवसेना सोडणार नाहीत. संजय राऊत वैयक्तिक कारणासाठी जेलमध्ये गेले नाहीत


संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्यासाठी भाजपचं कारस्थान
भाजपला संजय राऊत भारी पडलेले आहेत, त्यामुळे त्यांना कुठेतरी अडकवायचं, त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि जेलमध्ये टाकायचं हे भाजपचं कारस्थान आहे. तसंच जे गद्दार गेले संजय राऊत यांनी त्यांना समज केलं की ईडीची नोटीस येवो अथवा काही मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. ते गद्दार सैनिक आहेत, संजय राऊत बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक आहे. भाजपच्या दबावाखाली हे बोलत आहेत, त्यात रामदास कदम हे देखील आहे.