Vinayk Raut : महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद आता संसदेतही धडकला आहे. आज संसदेत सर्वपक्षीय बैठकीत या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. "शिवसेना या मुद्द्यावरून अधिवेशनात आवाज उठवणार आहे. राज्यपाल हे महाराष्ट्राची सर्वात मोठी समस्या बनलेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. 


यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, "केंद्रशासन नियुक्त राज्यपाल ही महाराष्ट्राची सध्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. लोकनियुक्त शासनाला अस्थिर करण्याचा प्रयत्न राज्यपालांच्या माध्यमातून होत आहे. राज्यपालांनी संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत राहून काम करणं आवश्यक आहे. सर्वच बिगरभाजप राज्यांसाठी राज्यपाल समस्या बनले आहेत. याबाबत आपण सभागृहात आवाज उठवणार आहे."


आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पश्चिम बंगालसह महाराष्ट्रानेही या मुद्द्यावरून अधिवेशनात चर्चेची मागणी केल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. विनायक राऊत म्हणाले, "आगामी अधिवेशनात राज्यपाल या विषयावर चर्चा झाली पाहिजे. यासोबतच सर्व मुद्यांवर चर्चा व्हावी अशी विरोधकांची इच्छा आहे. सभागृह बंद पाडण्याची कुठलीही विरोधकांची भूमिका नाही. सरकारने चर्चा नाकारली तर गोंधळ होणारच असे म्हणत पेगाससबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली.


दरम्यान, राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील 12 आमदारांची रखडलेली  नियुक्ती, महाराष्ट्र सरकारने बदललेला विद्यापीठ कायदा, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये छुपा वाद सुरू आहे. हा वाद आज संसदेपर्यंत जाऊन पोहोचला आहे.


महत्वाच्या बातम्या