मुंबई : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाऊन तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी दिली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असं म्हणत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर त्यांच्याच मुलीने निशाणा साधला आहे.


शर्मिष्ठा मुखर्जी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. या वृत्ताचं खंडन करत असा आपला कोणताही विचार नसल्याचं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी स्पष्ट केलं. शिवाय प्रणवदांच्या नागपूर भेटीमुळेच या अफवा पसरवल्या जात असल्याचं म्हणत त्यांनी वडिलांवरच निशाणा साधला.

आजच्या घटनेतून तुम्ही काही तरी समजून घ्याल, अशी अपेक्षा करते. आरएसएसच्या कार्यक्रमात तुम्ही दिलेलं भाषण विसरलं जाईल, पण तिथली दृष्य उरतील आणि भविष्यात ते वापरले जातील, असं ट्वीट शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केलं.

प्रणव मुखर्जी नागपुरात

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या प्रणव मुखर्जींच्या स्वागतासाठी काँग्रेसकडून कुणीही उपस्थित नव्हतं. आरएसएसने आपल्या पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं.

नागपुरात आरएसएसच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 7 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.

कोण आहेत शर्मिष्ठा मुखर्जी?

शर्मिष्ठा मुखर्जी प्रणव मुखर्जींच्या कन्या आहेत. शिवाय त्या कथ्थक डान्सर आणि कोरिओग्राफरही आहेत. शर्मिष्ठा यांनी 2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2015 साली दिल्लीतील ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र यामध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.

प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द

प्रणव मुखर्जी यांनी यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत. अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. काही काळासाठी ते काँग्रेसवर नाराजही होते, त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षाची स्थापना केली, मात्र पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. 2004 साली काँग्रेसने विजय मिळवला तेव्हा प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान असतील, अशी चर्चा होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. काँग्रेसच्या पाठिंब्यावर 2012 साली ते राष्ट्रपती झाले.

संबंधित बातमी :

प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल, वादावर काय बोलणार?