मुंबई : मागील वर्षी शेअर बाजारात आयपीओचा (IPO) चांगलाच बोलबाला पाहायला मिळाला. 2021 मध्ये तब्बल 63 कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले आणि यातून 1.2 लाख कोटी रुपये कंपन्यांनी उभारले. यंदाच्या वर्षी देखील हाच आयपीओ पॅटर्न शेअर बाजारात दिसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे याही वर्षी IPO च्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल होण्याची शक्यता आहे. 


नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच 23 कंपन्या त्यांचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. जानेवारी ते मार्च या चालू तिमाहीत आयपीओतून 23 कंपन्या एकूण 44 हजार कोटी उभारणार आहेत. यात विशेष म्हणजे रामदेव बाबा ते गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे आयपीओ याच महिन्यात येणार आहेत. गौतम अदानी यांच्या अदानी विल्मरचा 4 हजार 500 कोटींचा आयपीओ याच महिन्यात येणार आहे. तर रामदेव बाबांच्या रुची सोया कंपनीचा जवळपास 4 हजार 300 कोटी रुपयांचा आयपीओही याच महिन्यात येणार आहे. गो एअरलाइन्स देखील जवळपास 3600 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार आहे.


कोणत्या कंपनीचा आयपीओ बाजारात येणार?


कंपनी                                                         आयपीओची किंमत
मोबिक्विक                                                         1900 कोटी
ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लि.                      998 कोटी
ट्रॅक्सन टेक्नॉलॉजी                                               500 कोटी
स्कॅनरे टेक्नॉलॉजी                                               400 कोटी
ईएसडीएस सॉफ्टवेअर लि.                                   332 कोटी


याशिवाय याच वर्षात बहुप्रतिक्षीत एलआयसी कंपनीचा देखील आयपीओ येणार आहे. त्याच दृष्टीने एलआयसीकडून डीमॅट अकाऊंट उघडण्याबाबत वृत्तपत्रातून जाहिरात देखील करण्यात येतेय. त्यामुळे यंदाच्या वर्षात देखील जे आयपीओतून कमवण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.


आयपीओ म्हणजे काय?
इनिशियल पब्लिक ऑफर म्‍हणजे आयपीओ. यासाठी कंपन्‍या शेअर बाजारमध्‍ये स्‍वत:ला लिस्‍टेड करून शेअरमध्‍ये गुंतवणूकदारांना विकण्‍यासाठी प्रस्‍ताव आणतात. शेअर बाजारात लिस्‍टेड झाल्‍यामुळे कंपनीच्‍या बाबतीत विस्‍तृत माहिती सार्वजनिक होते. सूचीबद्ध झाल्‍यानंतरच कंपनीचे अधिग्रहण किंवा दुस-या कंपनीत वर्ग होता येते.


दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारात सर्वत्र तेजी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसात बाजारात काहीसं ओमायक्रॉन, लॉकडाऊन यामुळे निराशाचं वातावरण होतं. त्यामुळे आज बाजारात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आज सुरुवातीच्या सत्रापासूनच बाजारात तेजी पाहायला मिळाली आणि ती शेवटच्या सत्रापर्यंत कायम होती.


महत्त्वाच्या बातम्या :