नवी दिल्ली : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. "विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं, आता ते खुलं झालं आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं शरद पवार म्हणाले. नवी दिल्लीत पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.


पक्षासाठी हा निर्णय घेत असल्याचं नाना पटोले यांनी सगळ्यांना कळवलं होतं. त्यांनी ही पक्षीय जबाबादारी घेतली आहे. हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. असं शरद पवारांनी सांगितलं. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, "आता बघू चर्चेनंतर ठरवू. व्हेकन्सी झालेली आहे, आता सगळेच पक्ष त्याच्यावर चर्चा करु शकतात."


काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाना पटोले यांनी बुधवारी (3 फेब्रुवारी) राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यास विधानसभा अध्यक्ष कोण?
नाना पटोले काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण? हा सवाल उपस्थित होत आहे. जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.


राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस तर उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहिल असं ठरलं होतं. त्यामुळे सध्या तरी हे पद काँग्रेसकडे आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये तीन नावांची चर्चा सुरु असताना, शरद पवार यांनी या पदाबाबत पुन्हा चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता तिन्ही पक्षांमधील चर्चेनंतरच विधानसभा अध्यक्षपदबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.