नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनावरुन देशातील सेलिब्रेटींसह विदेशातील सेलिब्रेटी देखील समर्थनार्थ आणि विरोधात उतरले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले होते. रिहानाच्या या ट्वीटवरून कंगनाने निशाणा साधला होता. "आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही", अशी टीका तिने केली होती. तसेच कंगनानं शेतकरी आंदोलकांना "अतिरेकी" म्हणत भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं म्हटलं होतं. ट्विटरनं यासंदर्भात आक्षेप घेत कंगनाचे ट्विट डिलिट केले आहेत.


ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही लागू केलेल्या पॉलिसीच्या श्रेणीनुसार ट्विटर नियमांचे उल्लंघन करणार्‍या ट्विटवर कारवाई केली आहे.


पॉप स्टार रिहाना काय म्हणाली?
कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकङऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली आणि लिहिले की, "आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे."


कंगनाचा रिहानावर पलटवार
कंगनाने ट्वीट केले की, "या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बसून राहा. आमचा देश विकायला आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही.''