नवी दिल्ली : "आतापर्यंत शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आंदोलन, इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली.


सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीचा फटका पडला आहे. पण या समस्या कशा वाढतील यावर मोदी सरकारचे लक्ष आहे. आज भारत सरकार यावर लक्ष देत नाही. पेट्रोलियम पदार्थांवर जास्त उत्पन्न घेत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे देशातील जनता नाराज आहे, असं शरद पवार म्हणाले.


पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही ही खेदाची बाब
आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना नागरिकांच्या समस्यांशी काही घेणं देणं नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान 20 ते 30 किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही हे खेदाची बाब आहे. आज जे शांततेत आंदोलन आहे ते जर वाढलं तर त्याला वेगळं वळण लागेल आणि यासाठी जबाबदार भाजप सरकार असेल. हे सरकार संवेदनशील नाही. विरोधी पक्षातील नेते आज आंदोलक शेतकऱ्यांची भेट घ्यायला जाणार होते मात्र त्यांना भेटू दिलं गेलं नाही. शेतकऱ्यांना जे अडथळे निर्माण केले आहेत हे आजवर कधी झालं नाही. आज शेतकऱ्यांना जी वागणूक मिळत आहे त्यामुळे देशासमोर एक संकट उभं राहणार आहे. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. संसदेत काही झालं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही. जर चर्चा झाली असती तर आंदोलन इतकं वाढलं नसतं, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

विदेशी सेलिब्रिटींच्या ट्वीटबद्दल काय म्हणाले?
देशात सुरु असलेल्या असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉपस्टार रिहाना, सामाजसेविका ग्रेटा थर्नबर्र, मिया खलिफा यांनी भाष्य केलं. त्यानंतर बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये नाक खुपसू नये, असं म्हणत देशभरातील खेळाडू, बॉलिवूड अभिनेत्यांनी ट्वीट केले. याविषयी विचारला असता शरद पवार म्हणाले की, "शेतकऱ्यांची समस्या आंतरराष्ट्रीय बनली आहे त्यावर बाहेरचं कुणी बोलावं याचं समर्थन नाही. मात्र देशाच्या सरकारने शांत राहणे आणि इथली समस्या बाहेर गेली हे योग्य नाही."


विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा करण्याचे पवारांचे संकेत
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. "विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं आता ते खुलं झालं आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं शरद पवार म्हणाले.