नवी दिल्ली : शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट झाली. जवळपास 57 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. राजधानी दिल्लीत आज सकाळी साडेदहाच्या सुमारास साऊथ ब्लॉकमधल्या पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट झाली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उत आला नसता तरच नवल.
पवार आणि मोदी याआधी भेटले ते नोव्हेंबर 2019 मध्ये ज्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेच्या घडामोडी सुरु होत्या. त्यावेळी संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर सतरा- अठरा महिन्यानंतर दोघांमध्ये ही भेट झाली आहे. भेटीचा तपशील अजून गुलदस्त्यात असला तरी सहकार आणि बँकिंगसंदर्भातल्या प्रश्नांवर ही चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यासंदर्भातलं एक सहा पानी पत्रही पवारांनी आज मोदींना दिलंय.
मागच्याच महिन्यात 8 जूनला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. त्यापाठोपाठ आता पवारांची दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनंही या भेटीगाठींना महत्व आहेत. त्यात पवारांची आजची भेट ही ठाकरेंना पूर्वकल्पना देऊनच झाल्याचं समोर आले आहे.
संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरु होतंय. त्याच्या दोन दिवस आधीच पवार दिल्लीत दाखल झाले. काल भाजपचे राज्यसभेतले नवनिर्वाचित सभागृह नेते पीयुष गोयल पवारांना भेटले, कालच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पवारांची, ए.के. अँटनी या माजी संरक्षणमंत्र्यांना भेटून चीनसंदर्भातली वस्तुस्थिती सांगितली. आज थेट ब-याच काळानंतर पवार-मोदींची भेट..त्यात कालच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते..आणि त्यांनीही मोदींची भेट घेतल्याच्या चर्चा सुरु आहेत.
केंद्र सरकारनं नव्यानंच स्थापन केलेलं सहकार खातं हे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. शिवाय सहकारी बँकांसंदर्भात बदललेल्या नियमांबाबतही पवारांची नाराजी आहे. प्रथामिकदृष्ट्या यावरच चर्चा झाली असली तरी याशिवाय महाराष्ट्रात ईडीच्या धाडसत्राबाबतही काही चर्चा झाली असू शकते. कारण राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरची कारवाई आता वेग घेत आहे.
मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पवार आणि मोदींची भेट सातत्यानं व्हायची. नंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर या भेटी काहीशा कमी झाल्या होत्या. पण आज अचानक या भेटीनंतर पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
संबंधित बातम्या :
दिल्लीतल्या दोन दिवसांच्या बैठकसत्रांवर शरद पवार नेमकं काय बोलले?