Shahaji Bapu Patil: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील मंत्री आमदार, खासदारांसह गुवाहाटीला गेले आहेत. या दौऱ्यात आज पुन्हा एकदा चर्चेत आलेत आमदार शहाजी बापू पाटील. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील शिंदे गटात गेले अन् गुवाहाटीला पोहोचले. तिथं गेल्यानंतर त्यांनी केलेला एक फोन प्रचंड व्हायरल झाला. त्या फोन कॉलमधील काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के हा डायलॉग तर प्रचंड गाजला. त्यावर खूप चर्चा झाली, इतकंच काय त्यावर गाणी देखील बनली. त्याचा परिणाम आता असा झाला आहे की, शहाजी बापूंना जिथं जाईल तिथं हा डायलॉग म्हणण्याची विनंती केली जाते.
याच शहाजीबापूंची भुरळ आता आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना देखील पडली. त्यांनी शहाजी बापूंना काय झाडी, काय डोंगार हा डायलॅाग बोलायला लावला. शहाजीबापूंनीही त्यांच्या विनंतीला मान देत हा डायलॉग मराठी भाषेसह नंतर इंग्रजीत देखील बोलून दाखवला. यावेळी शहाजीबापूंसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील उपस्थित होते. शिवाय शहाजीबापूंना ते प्रोत्साहित देखील करत असल्याचं दिसून आलं.
एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार आणि खासदारांनी आज गुवाहाटीला जात कामाख्या देवीचं दर्शन घेतले. तीन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटी येथे मुक्कामी होते. गुवाहाटी येथे सर्वाधिक काळ त्यांचा मुक्काम होता. आमचे प्रयत्न सफल होऊ देत असे साकडे देखील कामाख्या देवीला घालण्यात आले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आहेत.
महाराष्ट्रात आसाम भवन तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन बनवणार
रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये सर्व आमदार खासदारांच्या समोर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. शिंदे गटातील आमदार, खासदारांना आसाम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. यावेळी आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा तसेच महाराष्ट्रात आसाम भवन बनवण्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीच्या आशिर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं झालंय. आम्हाला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सहकार्य केलं आहे असं म्हणत आसामच्या जनतेचे आभार यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
ही बातमी देखील वाचा