नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अतिशय सकारात्मकतेनं कोरोनाशी सुरु असणारा लढा जिकंण्याची जिद्द प्रत्येकानंच उराशी बाळगलेली असतानाच भारतीयांसाठी एक खास भेट केंद्रानं दिली. ही भेट म्हणजे कोरोना व्हायरसच्या लसींच्या आपातकालीन वापराला दिलेली मान्यता. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी रविवारी एक पत्रकार परिषद घेत सीरमच्या covishield आणि भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. ज्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणांना धीर मिळाला आणि देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनीही या अतिशय महत्त्वाच्या घोषणेनंतर एक सूचक ट्विट केलं. सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांनी येत्या आठवड्यांमध्ये कोविशिल्ड येत्या आठवड्यांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि लसीच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याऱ्या सर्वांचेच आभारही मानले.






दरम्यान, शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. ज्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI च्या मान्यतेची प्रतीक्षा असतानाच आजा ही परवानगीही मिळाल्यामुळं भारतात कोरोनाच्या लसीची प्रतीक्षा संपली आहे. याशिवाय आणखी एक दिलासा म्हणजे कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे.


आनंद व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले....


भारतात सीरम आणि भारत बायोटेकच्या लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर सर्वच स्तरांतून या महत्त्वाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या टप्प्यावर देशाचं अभिनंदन केलं. शास्त्रज्ञ, डॉक्टर, आरोग्य यंत्रणांमध्ये काम करणारे कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांत्याप्रती आणि त्यांच्या योगदानाप्रती मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली. आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी भारतात तयार झाल्या आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. आत्मानिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्याचं हे एक महत्वाचं पाऊल आहे, असं ते ट्विट करत म्हणाले.