नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नागरिकांना एक खास भेट मिळू शकते. ही भेट अशी आहे, ज्याची साधारण वर्षभरापासून सारा देश वाट पाहात होता. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. ज्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI कडून रविवारी याच संदर्भात 11 वाजण्याच्या सुमारास एका पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराबाबतच्या संमतीसाठी तज्ज्ञ समितीनं शिफारसही केल्याचं कळत आहे. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. यापूर्वी, ऑक्सफोर्ड लसीला तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली आहे. त्यामुळं आता या शिफारसींच्या टप्प्यानंतर मुख्य लसीकरणाचाच निर्णय प्रतिक्षेत असून, त्यातबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात (Coronavaccine) कोरोनाशी लढण्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन लसींना मान्यता मिळण्याची चिन्हं आहेत. ज्याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.

DCGI शी संलग्न अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडून जेव्हा कोणत्याही औषधास मान्यता मिळते, तेव्हा त्या कंपनीला CT23 अर्थान परवानगी मिळते. ज्यानंतर औषधाची निर्मिती ज्या राज्यात केली जात आहे ते राज्य स्टेट ड्रग रेगुलेटरी अथॉरिटीकडे जाऊन ड्रग एंडोर्समेंटची मागणी करतं. ज्यानंतर हे औषध रोल आऊट होतं. या प्रक्रियेसाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

Corona Vaccine Dry Run: मुंबई पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज, ड्राय रनचीही गरज नाही!

देशात लवकरच सुरु होणार कोरोना लसीकरण

सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी अर्थात तज्ज्ञ समितीच्या शिफारसीच्या आधारे डीसीजीआई एका मोठ्या निर्णयावर पोहोचणार आहे. त्यामुळं या दोन्ही लसींच्या निर्धारित आपात्कालीन वापराला परवानगी मिळताच भारतात तातडीनं कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

अफवांना बळी पडू नका- केंद्रीय आरोग्यमंत्री

भारतात जगभरातील सर्वात मोठ्या लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच अनेक अफवा पसरण्याचीही शक्यता आहे. पण, अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे. लसीकरणाच्या पडताळणीमध्चे सुरक्षितता आणि प्रभावीपणा हे मुख्य निकष असून त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलं. तेव्हा आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे दिलासा देणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या अधिकृत तारखा जाहीर होण्याच्या वृत्ताची.