Covid19 Vaccine: देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा चिंता वाढत आहे. वाढत्या कोरोना (Corona) प्रकरणांमुळे लोकांना पुन्हा एकदा मास्क घालणे आणि एकमेकांपासून अंतर राखणे भाग पडले आहे. भारतात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2.20 अब्ज लशींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)चे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी कोरोना लशींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सीरमकडे कोरोनाच्या 50 ते 60 लाख लशींचे डोस असून रुग्णालयांकडून मागणी मात्र शून्य असल्याचं ते म्हणाले.


देशभरातील वाढत्या कोरोना प्रकरणांवर भाष्य करताना सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांनी कोरोना व्हायरसचा सध्याचा प्रकार गंभीर नसल्याचे म्हंटले आहे. यावेळी, आमच्याकडे कोरोना प्रतिबंधक लशींचे पाच ते सहा दशलक्ष डोस उपलब्ध आहेत, परंतु रुग्णालयाकडून कोरोना लशींची मागणी होत नसल्याचे ते म्हणाले. येत्या दोन ते तीन महिन्यांत सीरम इन्स्टिट्यूट आणखी कोविशील्ड डोस देखील तयार करणार आहे.


आमच्याकडे लशींचा 50 ते 60 लाख साठा शिल्लक - आदर पुनावाला


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, आम्ही 5 ते 6 दशलक्ष कोरोना लशींचे डोस तयार ठेवले आहेत. मात्र रुग्णालयांकडून कोरोना प्रतिबंधक लशींची मागणी शून्य आहे, कोरोना लशींची मागणी थांबली आहे. पुढे ते म्हणाले, कोरोना विषाणूचा सध्याचा प्रकार फारसा गंभीर नसून ज्येष्ठ नागरिकांनी खबरदारी म्हणून बूस्टर डोस घ्यावा.






कोरोना विषाणू गंभीर नाही - पुनावाला


आदर पुनावाला पुढे म्हणाले, सध्या कोरोनाचा धोका तितका गंभीर नाही, लोकांमध्ये दिसत असेलली कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. ज्येष्ठ नागरिक केवळ खबरदारीच्या उपायांसाठी बूस्टर डोस घेऊ शकतात, परंतु बुस्टर डोस घ्यायचा की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. तर, आम्ही येत्या दोन ते तीन महिन्यांत कोविशील्ड लशीचे आणखी 5 ते 6 दशलक्ष डोस तयार करणार आहोत, असेही ते म्हणाले.


राज्यांनी सतर्क राहावं, केंद्राचे निर्देश


केंद्राने शुक्रवारी उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रासह आठ राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा प्रसार असणाऱ्या भागात उपाययोजना करण्यासही केंद्राने सांगितले आहे. यूपी, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणा आणि दिल्लीला कोरोनाबाबत लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी या राज्यांना कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा दाखवू नये, असे आवाहन केले आहे.


मार्च महिन्यापासून देशात कोविडच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोविडचे 12,193 नवीन रुग्ण आढळले आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना संसर्गामुळे आणखी 42 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंतच्या कोरोना मृतांची संख्या 5,31,300 वर पोहोचली आहे.