Rahul Gandhi Vacates Bungalow: सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगलाही सोडावा लागला आहे. हा शासकीय बंगला सोडताना राहुल गांधी आज भावूक झाल्याचं दिसून आलं. ही सत्य बोलण्याची किंमत मी चुकवत आहे, मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 


 






काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील त्यांचा तुघलक लेनचा बंगला सोडला. त्यावेळी ते म्हणाले की, "मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. भारतातील जनतेने मला हे घर 19 वर्षांसाठी दिले, मला त्यांचे आभार मानायचे आहेत. ही सत्य बोलण्याची किंमत आहे. मी सत्य बोलण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे."


 






राहुल गांधी यांनी शनिवारी तुघलक लेनचा बंगला पूर्णपणे रिकामा केला. मोदींच्या आडनावावर केलेल्या टिप्पणीबद्दल मानहानीच्या आरोपाखाली सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना न्यायालयाकडून 30 दिवसांचा अवधी मिळाला आहे.


बंगल्याच्या चाव्या देताना म्हणाले,


आपण यापुढेही लढत राहणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, 19 वर्षांनंतर मी घर सोडत आहे. हे घर देशातील जनतेचे आहे, मी आता 10 जनपथवर राहणार आहे. बंगल्याच्या चाव्या देताना राहुल गांधी भावूक झाल्याचं चित्र दिसून आलं. त्यांनी लोकसभा सचिवालयाला या चाव्या सुपूर्द केल्या आहेत. 


संसदेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती.शनिवारी दुपारी काँग्रेस नेत्याच्या सामानाने भरलेले ट्रक बंगल्यातून बाहेर पडताना दिसले. यापूर्वी 14 एप्रिल रोजी त्यांनी त्यांच्या बंगल्यातील कार्यालय आणि त्यांच्या काही वैयक्तिक वस्तूंचे हस्तांतरण केले होते. याशिवाय, शुक्रवार 21 एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांनी बंगल्यातून काही सामान ट्रकमध्ये नेले होते.


 






'हे घर त्यांना देशातील जनतेने दिले आहे'


काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की, हे घर त्यांना देशातील जनतेने दिले आहे आणि हा निर्णय मला मान्य आहे. अदानीच्या प्रकरणावर राहुल गांधी अधिक जोरकसपणे आवाज उठवतील. हा मोठा लढा आहे, लढा पुढेही सुरूच राहणार आहे.