10 सप्टेंबर दिनविशेष : आजच्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान युद्धामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या शहीद अब्दुल हमिद यांना मरणोत्तर परमवीर चक्र जाहीर करण्यात आला. दिल्लीतील मुलींच्या शाळेत चेंगराचेंगरी होऊन पाच विद्यार्थिनींचा मृत्यू आणि 30 मुली जखमी झाल्या. ब्रिटिशांविरोधात लढा देणारे जहाल स्वातंत्र्यसैनिक बाघा जतिन यांचं आजच्या दिवशी निधन झालं. आज 10 सप्टेंबर रोजी देशात आणि जगातच्या इतिहासात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.


1966 : पंजाब आणि हरयाणा राज्यांना मान्यता


भाषिक आधारावर राज्याची निर्मिती करण्याचं धोरण जाहीर झाल्यानंतर देशात अनेक राज्ये उदयास आली. नंतरच्या काळात हिंदी भाषिक हरयाणा आण पंजाबी भाषिक पंजाबची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली. हीच मागणी लक्षात घेता 10 सप्टेंबर 1966 रोजी संसदेने पंजाब आणि हरयाणा या दोन नव्या राज्यांना मान्यता दिली. 


1965 : शहीद अब्दुल हमिद यांना मरणोत्तर परमवीर चक्र


पाकिस्तानसोबत झालेल्या 1965 सालच्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या अब्दुल हमिद यांना मरणोत्तर परमवीर चक्राने गौरवण्यात आलं. अब्दुल हमिद हे 4 ग्रेनेडियरमधील जवान होते. त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान खेमकरण सेक्टरच्या आसल उत्ताडमध्ये पराक्रम गाजवला होता. या युद्धात ते शहीद झाले. 


2009 : दिल्लीतील शाळेत चेंगराचेंगरी, 5 मुलींचा मृत्यू तर 30 जखमी


10 सप्टेंबर 2009 रोजी, गुरुवारी सकाळी शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत सरकारी मुलींच्या शाळेतील पाच विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. ईशान्य दिल्लीतील खजुरी खास येथील उच्च माध्यमिक शाळेत ही दुर्घटना घडली. शाळेच्या जिन्यावर संततधार पावसामुळे शाळेच्या भिंतीमध्ये विद्युत प्रवाह असल्याची अफवा पसरल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली.


1915 : स्वातंत्र्यसैनिक बाघा जतिन यांचे निधन


ब्रिटिश सत्तेविरोधात लढणाऱ्या जहाल स्वातंत्र्यसैनिक जतिंद्रनाख मुखर्जी उर्फ बाघा जतिन यांचे आजच्या दिवशी निधन झालं. लहानपणी वाघाला मारल्यामुळे त्यांना नंतर बाघा जतीन या नावाने ओळखलं जाऊ लागलं. बंगालमध्ये जहाल क्रांतिकारकांच्या यादीत त्यांचे नाव अग्रणी आहे. बाघा जतिन यांनी युगांतर पार्टीची स्थापना केली आणि नंतरच्या काळात या संघटनेने ब्रिटिशांविरोधात सशस्त्र क्रांती पुकारली.  


1894 : पहिल्यांदा ड्रिंक अँड ड्राईव्हसाठी दंड


लंडनचा टॅक्सी ड्रायव्हर जॉर्ज स्मिथला पहिल्यांदाच दारु पिऊन गाडी चालवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला.


1846: शिलाई मशिनचे पेटंट


मनुष्याच्या दैनदिन कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिलाई मशिनचा शोध अॅलायस होवे याने लावला होता. आजच्याच दिवशी, 10 सप्टेंबर 1946 रोजी त्यांने शिलाई मशिनचे पेटंट मिळवले.


2008 : लार्ज हायड्रॉन कोलायडर (LHC) ची पहिली चाचणी पूर्ण


लार्ज हायड्रॉन कोलायडर हा जगातील सर्वात मोठा पार्टिकल कोलायडर प्रकल्प आहे. अणू कणांचा अभ्यास करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे. लार्ज हायड्रॉन कोलायडरची निर्मिती युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्चने केली आहे. यामध्ये जगभरातील 100 देशांतील 10 हजाराहून शास्त्रज्ञांनी भाग घेतला आहे.


2002 : स्वित्झर्लंड संयुक्त राष्ट्र संघात विलीन


स्वित्झर्लंड संयुक्त राष्ट्र संघात विलीन झाला. स्वित्झर्लंड संयुक्त राष्ट्रांचा एक भाग बनला. स्वित्झर्लंड 190 वा सदस्य आहे.


1970 : स्टेफी ग्राफने टेनिसचे ग्रँडस्लॅम विजेती


यूएस ओपन जिंकणाऱ्या टेनिसपटू स्टेफी ग्राफने ग्रँडस्लॅम जिंकलं. 1970 मध्ये मार्गारेट कोर्टानंतर ही कामगिरी करणारी ती पहिली महिला ठरली.