नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधात लढा सुरु असतानाच, सरकारच्या तयारीला मोठा झटका बसला आहे. ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोविड जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्ये या सल्लागार ग्रुपची स्थापना केली होती.
कोरोना संकटात डॉ. शाहिद जमील यांना केंद्र सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. SARS-CoV-2 विषाणूच्या जीनोम स्ट्रक्चरची ओळख पटवण्यासाठी केंद्र सरकारने वैज्ञानिक सल्लागार ग्रुप बनवला होता, शाहिद जमील त्या ग्रुपचे अध्यक्ष होते. रविवारी (16 मे) त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.
डॉ. शाहिद जमील यांनी ग्रुपचं अध्यक्षपद का सोडलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र काही वृत्तानुसार कोरोनाबाबत सरकारच्या धोरण आणि तयारीवर ते समाधानी नव्हते. अशोका विद्यापीठात त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक असणाऱ्या शाहिद जमील यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता, ज्यात त्यांनी सरकारच्या तयारीवर टीका करत वैज्ञानिकांचा सल्ला ऐकत नसल्याचा आरोप केला होता. "मोदी सरकारने वैज्ञानिकाचं म्हणणं ऐकावं आणि धोरण बनवण्यासाठी हट्टी वृत्ती सोडा," असा सल्ला या लेखात त्यांनी दिला होता.
शाहिद जमील यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटकडे लक्ष वेधलं आणि लिहिलं की, "एक वायरोलॉजिस्ट म्हणून मी मागील वर्षापासून कोरोना आणि लसीकरणावर नजर ठेवून आहे. कोरोनाचे अनेक व्हेरिएंट पसरत असून ते कोरोनाच्या पुढच्या लाटेसाठी जबाबदार ठरु शकतात, असं माझं मत आहे. भारतात कोविड-19 ची दुसऱ्या लाटेचा वेग मंदावल्याचं दिसत आहे, परंतु ही लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त काळ राहिल आणि जुलैपर्यंत टिकेल. कोविड संसर्गाची दुसरी लाट पिकवर पोहोचली असल्याचं म्हणणं घाईचं ठरेल."
दुसरीकडे देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. दररोज लाखो लोक बाधित होत असून हजारोंच्या संख्येने कोरोनाचे बळी ठरत आहेत. याच दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.