नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षांची नवी टीम जाहीर झाली आहे. सोनियांच्या टीममधले जनार्दन द्विवेदी, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार यांची सद्दी संपली. राहुल गांधींच्या नव्या कार्यकारिणीमध्ये (CWC-Congress working committee) या नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सात महिन्यांनी सीडब्लूसीची घोषणा झाली. सीडब्लूसी अर्थात काँग्रेस वर्किंग कमिटी पक्षासाठी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.
कुठलाही माणूस सर्वोच्च अधिकार मिळाले की त्याची टीम निवडतो. राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारल्यावर सोनियानिष्ठांचं काय होतं याचीच त्यामुळे उत्सुकता होती. पण एकूण यादीवर नजर टाकली तर फार धाडसी बदल करण्याचं राहुल गांधींनी टाळलं. 2019 च्या महत्त्वाच्या निवडणुकीआधी पक्षातला जुन्या-नव्यांचा बॅलन्स टिकवून ठेवण्याचं सूत्र राखत त्यांनी सावधपणा दाखवला आहे.
हे सोनियानिष्ठ कायम
अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, अंबिका सोनी यांचं सीडब्लूसीमधलं स्थान अपेक्षेप्रमाणे कायम राहिलं.
यांची सीडब्लूसीमध्ये एन्ट्री
अशोक गहलोत, ज्योतिरादित्य सिंधिया, रणदीप सुरजेवाला, रणदीप हुड्डा, यांच्या रुपाने नव्या रक्ताला स्थान दिलं गेलं.
महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व काय?
काँग्रेस वर्कींग कमिटीची ही रचना महाराष्ट्राच्या दृष्टीनेही महत्वाची आहे. महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, अविनाश पांडे हे मुख्य सदस्य, तर बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, राजीव सातव यांना कायम आमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
या पाचपैकी इतर चार हे राष्ट्रीय पातळीवरचे पदाधिकारी आहेत. पण बाळासाहेब थोरात यांना सध्या राष्ट्रीय पातळीवर पद नसतानाही त्यांचा सीडब्लूसीमध्ये समावेश आहे. हायकमांड त्यांना पुढच्या काळात अजून मोठी जबाबदारी द्यायला उत्सुक असल्याचेच हे संकेत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांना दुरावा कशामुळे?
महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव देशमुख हे सोनियांच्या काळात वर्किंग कमिटीत राहिले आहेत. यातल्या कुणालाच राहुल गांधींच्या नव्या वर्किंग कमिटीत स्थान नाही. देशात सिद्धरामय्या, हरीश रावत, गोगोई यांच्यासारख्या काही माजी मुख्यमंत्र्यांना सामील करण्यात आलं आहे. पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मात्र यात समावेश नाही. इंदिरा गांधींच्या काळापासून दिल्लीत वजन राखून असणाऱ्या चव्हाण कुटुंबाला राहुल युगात जुळवून घेणं कठीण जातंय का अशी शंका त्यानिमित्ताने उपस्थित झाली आहे, की महाराष्ट्रासारखं राज्य हातातून घालवलं याची शिक्षा त्यांना मिळतेय याची चर्चा रंगू लागली आहे.
कशी आहे काँग्रेस वर्किंग कमिटीची रचना?
सीडब्लूसीचे 23 मुख्य सदस्य, 18 कायम आमंत्रित, 10 विशेष आमंत्रित आहेत. जे नेते राज्यांचे प्रभारी आहेत, त्यांना कायम आमंत्रित या गटात समाविष्ट करण्यात आलं आहे. तर महिला मोर्चा, इंटक, एनएसयूआय यासारख्या संघटनांचे प्रमुख विशेष आमंत्रित गटात आहेत.
राहुल गांधींच्या या टीममध्ये दिग्विजय सिंह, कमलनाथ यांचा समावेश नाही, पण ज्योतिरादित्य सिंधिया मात्र आहेत. या यादीत इतर तरुण चेहरे आहेत, पण सचिन पायलट का नाहीत, असाही प्रश्न काहींनी उपस्थित केला.
सचिन पायलट यांच्याबद्दल राहुल गांधींच्या मनात असुरक्षितता वाटते का असाही काहींनी सवाल केला. पण हे प्रश्न उपस्थित करताना कुठल्याही राज्याचे प्रदेशाध्यक्ष हे वर्किंग कमिटीत नसतात ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे. कमलनाथ मध्य प्रदेशचे, तर सचिन पायलट हे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शिवाय महाराष्ट्रातूही अशोक चव्हाण त्यामुळेच वर्किंग कमिटीत नाहीत.
काँग्रेस पक्षात दरबारी राजकारणाचं पहिल्यापासून प्रस्थ आहे. सीडब्लूसीमधल्या नावांवर नजर टाकल्यावर तुम्हालाही ही बाब जाणवेल. लोकांमधली प्रतिमा कशी आहे यापेक्षा तुम्ही दिल्लीशी निष्ठा किती दाखवता यावरच जास्त भर आहे.
राहुल गांधी आल्यानंतर काँग्रेसला नव्या दिशेने घेऊन जातील अशी अपेक्षा होती. पण तूर्तास तरी त्यांनी फार क्रांतीकारी पाऊल न उचलता जुन्याच वाटेने हळूहळू धक्के द्यायचे ठरवल्याचं दिसत आहे. ही वर्किंग कमिटी 2019 ला भाजपला टक्कर देऊन पुन्हा पक्षाला चांगले दिवस आणेल का हा खरा प्रश्न आहे.
स्पेशल रिपोर्ट : राहुल गांधींची नवी फौज, सोनियानिष्ठांची सद्दी संपली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2018 05:51 PM (IST)
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सात महिन्यांनी सीडब्लूसीची घोषणा झाली. सीडब्लूसी अर्थात काँग्रेस वर्किंग कमिटी पक्षासाठी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -