नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने जवळपास 6 वर्षांनी बचत खातं म्हणजे सेव्हिंग अकाऊंटच्या व्याजदारात अर्धा टक्क्याने कपात केली आहे. खात्यामध्ये एक कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेल्या ग्राहकांवर याचा परिणाम होईल.

बँकेचे जवळपास 9 लाख बचत खातेधारक आहेत. ज्यापैकी 90 टक्के ग्राहकांच्या खात्यात एक कोटींपेक्षा कमी रक्कम आहे. यासोबतच एसबीआयने बचत खात्यांसाठी द्विस्तरीय व्यवस्था लागू केली.

एक कोटींपेक्षा जास्त रक्कम खात्यात असणारे ग्राहक पहिल्या स्तरात आहेत, ज्यांना अगोदरप्रमाणेच 4 टक्के व्याजदर लागू राहिल. तर दुसऱ्या स्तरामध्ये खात्यात एक कोटींपेक्षा कमी रक्कम असणारे ग्राहक असतील. ज्यांच्यासाठी व्याजदर 3.5 टक्के असेल.

बचत खात्यातील रक्कमेवर कमीत कमी व्याजदर ठरवण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. आतापर्यंत कमीत कमी व्याजदर 4 टक्के ठेवण्यात आलं होतं. मात्र या दरात वाढ करण्याची बँकेची इच्छा असेल, तर आणखी वाढ करता येऊ शकते, अशी सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळेच येस बँक आणि कटक महिंद्रा यांसारख्या खाजगी बँकांनी बचत खात्यामधील रक्कमेवर 6 टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान याचा फायदा मोठी रक्कम किंवा ठराविक रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना बचत खात्यातील रक्कमेवर चार टक्केच व्याजदर देण्याचा निर्णय सरकारी बँकांनी घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेने 3 मे 2011 रोजी बचत खात्यातील रक्कमेवरील व्याजदर साडे तीन टक्क्यांहून 4 टक्के केलं होतं. मात्र आता एसबीआयने हे व्याजदर पुन्हा एकदा साडे तीन टक्के केलं आहे. त्यामुळे बचत खात्यामध्ये पडून असलेल्या पैशांवर ग्राहकांना आता पहिल्यापेक्षा व्याजदर कमी मिळणार आहे.