मोदी 2019 मध्येही पंतप्रधान होतील का, असा प्रश्न नितीश कुमार यांना विचारण्यात आला. मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यांना हरवण्याची क्षमता कुणातही नाही, असं उत्तर नितीश कुमार यांनी दिलं.
नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीवरही जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचाराशी तडजोड कधीच केली जाणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. सीबीआयच्या छाप्यांनंतर तेजस्वी यादव यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीही नव्हतं. अशा परिस्थितीत महायुतीमध्ये राहणं आपल्यासाठी कठीण होतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयू यांची बिहारमध्ये महायुती होती. मात्र लालूप्रसाद यादव यांच्यावरील सीबीआय छापेमारीनंतर नितीश कुमार यांनी महायुतीतून बाहेर पडत भाजपच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली आणि पुन्हा बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
काय आहे नेमकं प्रकरण?
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती.
या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती.
दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता.
बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती.