मुंबई : भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचा डेटा लीक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अमेरिकेची टेक वेबसाईट टेकक्रंचच्या वृतातनुसार, बँकेच्या सर्व्हरला पासवर्ड नव्हता. यामुळे लाखो खातेदारांची माहिती लीक झाल्याची भीती आहे. बँकेचं सर्व्हर मुंबईतील एका डेटा सेंटरमध्ये आहे.


या डेटा सेंटरमध्ये एसबीआय क्विकचा दोन महिन्यांचा डेटा ठेवला आहे. एसबीआय क्विक ही एक सिस्टम आहे, ज्याद्वारे खातेदारांना टेक्स्ट मेसेज आणि फोन कॉलवर त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती दिली जाते. सुरक्षा नसल्याने या सर्व्हरमधील हजारो ग्राहकांचे बँक बॅलन्स, खाते क्रमांक लीक झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

हा सर्व्हर किती वेळ खुला आणि सुरक्षेशिवाय होते याबाबत समजू शकलेलं नाही. एका सिक्युरिटी रिसर्चरला सर्व्हर खुला असल्याचं दिसलं आणि त्याने टेकक्रंचला याची सर्वात आधी माहिती दिली. यानंतर टेकक्रंचने एसबीआयशी संपर्क साधला याबाबत माहिती दिली. मग बँकेने सर्व्हर पासवर्ड टाकून पुन्हा सुरक्षित केला.

बॅकएंड दरदिवशी स्टोअर होणाऱ्या मेसेजमधू टेक्स्ट मेसेज लीक झाल्याचं टेकक्रंचने सांगितलं आहे. डेटाबेसमध्ये कोणताही पासवर्ड सेव्ह न केल्याने खातेदारांचे रिअल टाईममधील सर्व टेक्स्ट मेसेज पाहिले गेले. यामध्ये ग्राहकांचे फोन नंबर, बँक बॅलन्स आणि रिसेंट ट्रान्झॅक्शनचा समावेश आहे.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया आतापर्यंत याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र एसबीआयचा डेटाबेस रात्रीतच सुरक्षित करण्यात आलं आहे.

SBI Quick द्वारे बँकेचे खातेदार मिस्ड कॉल आणि टेक्स्ट मेसेज करुन खात्याची माहिती घेतात. BAL कीवर्ड पाठवायचा असतो. यामुळे बँक नोंदणीकृत खातेदाराचा मोबाईल नंबर ओळखते आणि त्यावर माहिती पाठवते. खातेदारांना बॅलन्स आणि शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती मिळते. याशिवाय या सेवेद्वारे एटीएम कार्ड ब्लॉकही करता येतं.