नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली असून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींनी संबोधित केले. सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला असून मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी सरकारने प्राथमिकता दिली असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, हे वर्ष देशासाठी अत्यंत महत्वाचे वर्ष आहे. यावर्षी महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आपण साजरी करत आहोत. आपला देश  महात्मा गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पुढे चालला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती कोविंद यांनी केले.

2014 च्या निवडणुकीआधी देश अनिश्चिततेच्या काळात होता मात्र यानंतर देश विकासाच्या वाटेवर चालला आहे. नवा भारत साकारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या सरकारने लोकांना सकारात्मक दिशा दिली आहे. सरकारने मूलभूत सुविधांना प्राथमिकता दिली आहे. सोबत सरकारी योजनांना नवी गती सरकारने दिली आहे, असेही राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

सरकारकडून 9  लाख कोटी शौचालयांची निर्मिती झाली आहे. गरिबांपर्यंत योजना पोहोचविण्याचा सरकारचा संकल्प आहे. सरकारकडून 6 कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. आयुष्य योजनेच्या अंतर्गत 50 कोटींहून अधिकांना लाभ झाला आहे.

कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचा संकल्प सरकारने केला आहे. जनतेचे आयुष्य प्रकाशमान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जनतेला आरोग्य विमा योजनेचा देखील मोठा लाभ झाला आहे. 20 कोटी जनतेला विमा योजनेचा लाभ झाला आहे. 2  कोटी 47 लाख घरांना वीज जोडणी केली असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

रेरा कायद्यानुसार बिल्डर लॉबीवर लगाम घालण्यात आला आहे. सरकारकडून 1 कोटी 30 लाख घरांची निर्मिती झाली असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोबतच तिहेरी तलाकचा निर्णय घेत मुस्लिम भगिनींना  दिलासा दिला असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

सरकारने एक कोटी युवकांना कौशल विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. युवकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले आहे. या योजनेचा लाभ 4 कोटीपेक्षा अधिक युवकांनी घेतला आहे. भारताचे नाव स्टार्ट अप मध्ये आघाडीवर आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.