मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने देशभरातील सुमारे 1300 शाखांची नावं आणि आयएफएससी कोडमध्ये बदल केला आहे. संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांच्या सोयीसाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. बँकेने या शाखांची नवी नावं आणि नवे आयएफएससी कोडची यादी जारी केली आहे. एकूण 1295 शाखांच्या नावात हा बदल करण्यात आला आहे.


1 एप्रिल 2017 रोजी पाच संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेचं एसबीआयमध्ये विलिनीकरण झालं होतं. यानंतर विलीनीकरणानंतर एसबीआयाच विस्तार आणि मूल्यांकन वाढलं. बँकेने जी यादी जाहीर केली आहे, त्यात शाखांची जुनी नावं आणि आयएफएससी कोडचाही उल्लेख करण्यात आला आहे. कोणत्या बँकेचा नवा कोड काय आहे, हे एसबीआयच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

इथे यादी पाहा

एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक आहे. देशभरात बँकेच्या 22,428 शाखा आहेत. जगभरातील बँकांच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत एसबीआय 53 व्या स्थानावर आहे. 30 जून, 2018 पर्यंत एसबीआयची एकूण संपत्ती 33.45 लाख कोटी रुपये होती.

मागील वर्षी एप्रिलमध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि भारतीय महिला बँकेचं एसबीआयमध्ये विलीनीकरण झालं होतं. या विलीनीकरणामुळे एसबीआयच्या 1805 शाखा कमी झाल्या. एसबीआयकडे आधी दोन लाख कर्मचारी होते. आता कर्मचारी संख्येत 71 हजारांनी वाढ झाली आहे.