Savitribai Phule Birth Anniversary : सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.


भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला.


भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली. 


ज्योतिबा फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 10 वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी काम करताना त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि समाजातून बहिष्कृत व्हावं लागलं. 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या या शाळेत केवळ नऊ मुली होत्या. 


सावित्रीबाई फुले यांची कारकीर्द 


शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Important Days in January 2023 : नवीन वर्षाची सुरुवात, संक्रांत, भारताचा प्रजासत्ताक दिन; 'ही' आहे महत्त्वाच्या दिवसांची यादी