Important Days in January 2023 : नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे दोन दिवस बाकी राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. तसेच नवीन वर्षात मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन याचबरोबर अनेक थोर महापुरुषांच्या जयंती देखील या महिन्यात आहेत. त्यामुळे जानेवारी महिना अनेक अर्थांनी खास आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात या महिन्यातील महत्त्वाचे दिवस कोणते आहेत. 


1 जानेवारी : जागतिक कुटुंब दिन (Global Family Day) 


जागतिक कुटुंब दिन दरवर्षी 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या दिवशी साजरा केला जातो. आरोग्य, शिक्षण, लैंगिक समानता, मुलांचे हक्क आणि सामाजिक समावेश यासारख्या कुटुंबांच्या कल्याणासाठी केंद्रस्थानी असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 


1 जानेवारी : नवीन वर्षाचा पहिला दिवस 


1 जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांत या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. 2023 हे वर्ष सुरु व्हायला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांत नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तसेच, नवीन वर्षाच्या निमित्ताने या दिवशी अनेक संकल्पदेखील केले जातात. 


3 जानेवारी : सावित्रीबाई फुले जयंती - महिला मुक्ती दिन  


सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.


4 जानेवारी : जागतिक ब्रेल दिन (World Braille Day)


पूर्वी अंध लोकांना काहीही दिसत नसल्यामुळे शिक्षण घेता येत नसे. मात्र त्यांच्या अंधकारमय जीनवात ब्रेल लिपीमुळे प्रकाश पडला. ब्रेल लिपीमुळेच अंध माणसे डोळस होऊ लागली. ही ब्रेल लिपी विकसित करणारे लुई ब्रेल यांची आज जयंती. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण गजात विश्व ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो.


6 जानेवारी : मराठी पत्रकार दिन - बाळशास्त्री जांभेकर दर्पण 


महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. जुलै 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.


9 जानेवारी : भारतीय प्रवासी दिन - NRI (Non-Resident Indian) Day 


NRI किंवा प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी भारताच्या विकासासाठी परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.


10 जानेवारी : अंगारक संकष्टी चतुर्थी


श्रीगणेशाचा आशिर्वाद मिळावा यासाठी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चना केली जाते. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक आणि शुक्ल पक्षात एक अशा दोन चतुर्थी तिथी येतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. आज फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील भालचन्द्र संकष्टी चतुर्थी आहे. यावेळी संकष्टी चतुर्थी सोमवारी आली आहे. गणेशभक्त या दिवशी देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपवास करतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यानं मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.


10 जानेवारी : जागतिक हिंदी दिन 


10 जानेवारी हा दिवस जगभरातील हिंदी साधकांसाठी खूप खास दिवस आहे. कारण या दिवशी 'जागतिक हिंदी दिन' साजरा केला जातो. जगभरात हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार करणे हे या दिवसामागचे महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. जगात हिंदीला चालना देण्यासाठी आणि हिंदी भाषेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळख निर्माण करू देण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. परदेशातील भारतीय राजदूत हा दिवस विशेषरित्या साजरा करतात. या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विविध विषयांवर हिंदीमधील व्याख्याने आयोजित केली जातात. जगात हिंदीचा विकास व प्रसार व्हावा म्हणून जागतिक हिंदी परिषदेची सुरुवात झाली. 


11 जानेवारी : लाल बहाद्दूर शास्त्री पुण्यतिथी


लाल बहाद्दूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांनी 'जय जवान जय किसान' ही घोषणा लोकप्रिय केली आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने 11 जानेवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले.


13 जानेवारी : लोहरी 


लोहरी हा 2023 सालचा पहिला सण आहे. लोहरी हा सण कापणीच्या हंगामाची सुरूवात करतो. उत्तर भारतात, मुख्यतः पंजाब आणि हरियाणामध्ये तो पूर्ण उत्साहाने साजरा केला जातो. लोहरी सण 13 जानेवारी 2023 रोजी शेकोटी पेटवून आणि त्याभोवती मित्र आणि नातेवाईकांसह नृत्य करून साजरा केला जातो. गव्हाचे देठ, तांदूळ, रेवरी, गूळ आणि मका लोक आगीत अर्पण करतात.


14 जानेवारी : पोंगल


भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक म्हणजे पोंगल आणि जगभरातील तमिळ समुदाय मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. तमिळ सौर दिनदर्शिकेनुसार, पोंगल हा सण ताई महिन्यात साजरा केला जातो. हा चार दिवसांचा कार्यक्रम आहे जो सूर्य देवाला समर्पित आहे. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, पोंगल सण 14 जानेवारी 2023 रोजी साजरा केला जाईल. हा चार दिवसांचा सण आहे. त्यामुळे हा 14 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत साजरा केला जाणार आहे.


15 जानेवारी : मकर संक्रांती 


मकरसंक्रांती हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.


15 जानेवारी : भारतीय सैन्य दिन


दरवर्षी 15 जानेवारी हा भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी 1949 मध्ये फील्ड मार्शल कोडंदेरा एम करिअप्पा यांनी शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता.


21 जानेवारी : त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय स्थापना दिन 


21 जानेवारी, 1972 रोजी, त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय ही राज्ये पूर्वोत्तर क्षेत्र (पुनर्संघटना) अधिनियम, 1971 अंतर्गत पूर्ण राज्ये बनली. म्हणून त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय 21 जानेवारी रोजी त्यांचा राज्यत्व दिन साजरा करतात.


24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day)


दरवर्षी 24 जानेवारी रोजी, भारतातील बहुसंख्य मुलींना भेडसावणाऱ्या असमानता, शिक्षणाचे महत्त्व, पोषण, कायदेशीर हक्क, वैद्यकीय सेवा आणि मुलींची सुरक्षा इत्यादींवर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.


24 जानेवारी : जागतिक शिक्षक दिन (International Day of Education) 


सर्वांसाठी सर्वसमावेशक, समान आणि दर्जेदार शिक्षणासाठी परिवर्तनात्मक कृतींना पाठिंबा देण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो.


25 जानेवारी : राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day)


दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन किंवा राष्ट्रीय मतदाता दिवस तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो. 2011 मध्ये प्रथमच हा दिवस निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त साजरा करण्यात आला.


25 जानेवारी : राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day)


दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची भूमिका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यासाठी साजरा केला जातो.


26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन (Republic Day) 


भारतात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 2022 रोजी  74 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.


30 जानेवारी : जागतिक कुष्ठरोग दिन (World Leprosy Day)


जागतिक कुष्ठरोग दिन जानेवारीच्या शेवटच्या रविवारी मुलांमध्ये कुष्ठरोगाशी संबंधित अपंगत्वाच्या शून्य प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पाळला जातो. जसे आपल्याला माहित आहे की अपंगत्व एका रात्रीत उद्भवत नाही परंतु निदान न झालेल्या रोगाच्या दीर्घ कालावधीनंतर होते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Important Days in December 2022 : महापरिनिर्वाण दिन, वर्षातील शेवटचा महिना यांसह डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस