Sardar Vallabhbhai Patel Jayanti Birth anniversary :  कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. सरदार पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त देशातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.  


National Unity Day: 'सरदार पटेल राष्ट्रीय एकता, अखंडतेचे अग्रदूत', पंतप्रधान मोदींकडून अभिवादन


सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 साली झाला. वल्लभभाई पटेल हे पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे अपत्य. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.


वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरताही त्यांनी कार्य केले. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.


सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्यामुळं त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे.
सरदारांनी 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेतले. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.