नवी दिल्ली: सरदार पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त देशातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी पंतप्रधान आणि इतरांनी सरदार पटेल यांचे भारतीय एकीकरणातील योगदानाचे स्मरण केले

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संदेशात असे म्हटले आहे की, "राष्ट्रीय एकता आणि अखंडता यांचे अग्रदूत लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांना विनम्र श्रध्दांजली.'' राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पतप्रधानांनी गुजरातमधील केवडिया येथे आयोजित एकता दिवस समारंभात भाग घेतला.

सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, "राष्ट्रीय एकतेचे प्रतिक आणि प्रत्येकाच्या हृदयात आपल्या कार्याने स्थान निर्माण करणाऱ्या सरदार पटेल यांना नमन. स्वातंत्र्यानंतर देशातील अनेक संस्थांने विखुरलेल्या स्वरुपात होती. त्यांचे एकीकरण करुन आजच्या मजबुत भारताचा पाया त्यांनी रचला. त्यांचे दृढ नेतृत्व, राष्ट्रासाठी समर्पण आणि विराट योगदानाचे देश कायम स्मरण ठेवेल."

गृहमंत्री अमित शाह यांनी असेही म्हटले आहे की, "संविधान आणि सनातन यांच्यात समतोल ठेवणारे अद्वितीय प्रतिक सरदार पटेल यांनी देशाच्या एकीकरणापासून सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण करण्यापर्यंत आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा देशात एकता निर्माण करण्यात अर्पण केला. अशा महान राष्ट्रभक्त लोहपुरुषाला राष्ट्राकडून वंदन.''

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सरदार पटेल यांना श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, "देशाचे प्रथम गृहमंत्री आणि देशाला एकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या सरदार वल्लभ भाई पटेल यांना जयंती निमित्त नमन. आजच्या दिवशी आपल्याला पुन्हा हा संकल्प करावा लागेल की राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा टिकवण्यासाठी स्वत:ला सदैव समर्पित करणे आवश्यक आहे."