Rahul Gandhi in Goa: गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी गोवा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान शनिवारी संध्याकाळी गोव्यातील तळेगाव येथील एसपीएम स्टेडियममध्ये राहुल गांधी फुटबॉलला किक मारताना दिसले. वास्तविक, राहुल गोवा काँग्रेस कार्यकर्ता अधिवेशनात गर्दीतून फुटबॉलला किक मारताना दिसले. हा व्हिडिओ राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना राहुल गांधींनी लिहिले की, "चला गोव्यासाठी नवीन युग सुरू करूया!"
फुटबॉलला किक मारत असताना लोकं राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी एक दिवसीय गोवा दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी शनिवारी सकाळी वेल्साव येथील मच्छिमारांची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांनी मच्छीमार समाजातील अनेक सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
बैठकीत ते म्हणाले, की "यूपीए सरकार सत्तेत असताना पेट्रोलची आंतरराष्ट्रीय किंमत प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचले होते. आज पेट्रोल आणि डिझेलच्या आंतरराष्ट्रीय किमती आम्ही सत्तेत होतो त्यापेक्षा खूपच कमी आहेत, पण तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलसाठी खूप पैसे मोजावे लागत आहेत."
त्याचवेळी गोव्यातील आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, "आम्ही निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते आणि ते वचन आम्ही पूर्णही केले." त्यांनी गोव्यातील जनतेला सांगितले की, "तुम्ही पंजाब, कर्नाटकात जाऊनही याची खातरजमा करू शकता. आमच्या जाहीरनाम्यात जे काही म्हटले आहे, ती हमी आहे, आश्वासन नाही."