RBI Governor : शक्तिकांत दास आरबीआयच्या गव्हर्नरपदावरून निवृत्त होत असून आता त्या जागी आता संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 11 डिसेंबर रोजी आरबीआय गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते महसूल विभागाचे सचिव म्हणून काम पाहतात. देशातील बँकिंग व्यवस्थेतील सर्वोच्च पद समजल्या आरबीआयच्या गव्हर्नरला सरकारकडून मोठ्या सुविधा देण्यात येतात. तसेच त्यांना लाखोंचा पगारही देण्यात येतो.
आरबीआय गव्हर्नरला कोणत्या सुविधा?
आरबीआय गव्हर्नरला मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू परिसरात राहण्यासाठी बंगला दिला जातो. तो बंगला प्रशस्त आणि आलिशान आहे. हा बंगला सर्वसुविधांनी युक्त असा आहे.आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना सांगितलं होतं की, गव्हर्नरला जो बंगला दिला जातो तो विकला तर त्याची किंमत 450 कोटींहून अधिक होते.
आरबीआय गव्हर्नरचा पगार किती?
निवृत्त होत असलेले गव्हर्नर शक्तिकांत दास यांना 2.5 लाख रुपये वेतन असल्याची माहिती एका माहितीच्या अधिकारातून समोर आली होती. त्या आधीचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनाही तितकेच वेतन होतं. आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरला 2.25 लाख इतकं वेतन तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला 2.16 लाख रुपये इतकं वेतन मिळतं.
RBI चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा कोण आहेत?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आयआयटी-कानपूरमधून शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवीही मिळवली आहे. संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणकाम अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. याआधी ते वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागाचे सचिव पदावर होते.
ही बातमी वाचा: