मुंबई: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेसची अडचण झालीय. काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेवर केलेलं भाष्य काँग्रेसची कोंडी करणारं ठरलंय. त्यांच्या वक्तव्यावरून खुद्द पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवलाय. तर काँग्रेसवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे. त्यानंतर आता सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसिज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
ईशान्य भारतीयांना चीनी म्हणाले
सॅम पित्रोदा बोलले आणि वाद पेटले, या समीकरणाला त्यांनी आताही तडा जाऊ दिला नाही. वारसा हक्काच्या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद शमण्याच्या आधीच पित्रोदांनी आणखी एक वक्तव्य करून आपल्याच पक्षाची म्हणजे काँग्रेसची अडचण केलीय. सॅम पित्रोदांनी एका मुलाखतीत भारताच्या विविधतेतल्या एकतेवर बोलायचं होतं. पण ते बोलताना त्यांनी ईशान्येकडच्या लोकांना चिनी, पश्चिमेकडच्या लोकांना अरेबियन, उत्तरेकडच्या लोकांना पाश्चात्यांसारखे गोरे आणि दक्षिणेकडच्या लोकांना आफ्रिकन ठरवून टाकलं.
भाजपला आयतं कोलीत
सॅम पित्रोदा यांच्या या वक्तव्याने ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पित्रोदांनी भाजपच्या हातात आयतं कोलीत दिलं. त्यावर निशाणा साधण्याची संधी पंतप्रधान मोदींनी सोडली नसती तरच नवल. काँग्रेसनं मात्र पित्रोदांच्या या वक्तव्यापासून फारकत घेतलीय. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय की, भारताच्या विविधतेचं वर्णन करण्यासाठी पित्रोदांनी दिलेलं उदाहरण दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह आहे. या विधानांशी काँग्रेसचा काहीच संबंध नाही.
याआधीही पित्रोदांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं करून काँग्रेसची कोंडी केली आहे. त्यांची वादग्रस्त वक्तव्य कोणती आहेत ते पाहुयात,
1. वारसा कर - अमेरिकेत एखाद्याच्या मृत्यूनंतर 55 टक्के संपत्ती सरकारजमा होते, भारतात असा कोणताही कर नाही.
2. राम मंदिराचा मुद्दा - बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य यासाखे प्रश्न मंदिरामुळे सुटणार नाहीत.
3. सन 1984 शीख दंगल - 'हुआ ते हुआ' असं म्हणत वादाला जन्म.
4. बालाकोट एअर स्ट्राईक - पुलवामा हल्ल्यानंतरच्या बालाकोट एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह.
5. नेहरू विरुद्ध आंबेडकर - घटनेच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा नेहरूंचा जास्त सहभाग होता.
इतिहासापासून काँग्रेस नेते धडा घेत नाहीत
काँग्रेसचे आणखी एक नेते मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींना चायवाला म्हणण्यासारख्या केलेल्या विधानांचा भाजपला गेल्या निवडणुकीत फायदा झाला होता. त्यापासून कोणताही धडा न घेता सॅम पित्रोदासारखे काँग्रेसचे नेते बेधडक वक्तव्य करत राहतात आणि मग काँग्रेसवर सारवासारव करण्याची वेळ येते.
ही बातमी वाचा: