Salman Rushdie : भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला. हल्लेखोराने स्टेजवर पोहोचून रश्दी यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. मुंबईत जन्मलेले 75 वर्षीय सलमान रश्दी इस्लामिक कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. 'सॅटेनिक व्हर्सेस' ही कादंबरी प्रकाशनापासूनच म्हणजे 1988 पासून वादात आहे. या कादंबरीमुळे सलमान यांना तब्बल 9 वर्षे लपून राहावं लागलं असून या कादंबरीचे भाषांतर करणाऱ्यांसह 59 जणांचा आतापर्यंत वेगवेगळ्या हल्ल्यांत मृत्यू झालाय.

  


1988 मध्ये सलमान यांच्या सॅटनिक व्हर्सेस या कादंबरीचे प्रकाशित झाले. कादंबरी प्रकाशीत झाल्यापासून त्या विरोधात जगभर निदर्शने झाली. वाढत्या विरोधामुले या कादंबरीवर भारतात बंदी घालण्यात आली. वायकिंग पेंग्विन या प्रकाशन कंपनीने ही कादंबरी प्रकाशीत केली होती. त्यामुळे इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खोमेनी यांनी रश्दींना आणि वायकिंग पेंग्विन या प्रकाशन कंपनीच्या मालकाला ठार करण्याचा फतवा काढला होता. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. कादंबरीवरून वाद टोकाला गेल्यामुळे सलमान रश्दी यांना तब्बल नऊ वर्षे लपून राहावं लागलं होतं.


ब्रिटनमध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली. परंतु, त्यावर बंदी घालण्यासाठी जगभरातून मागणी होऊ लागली. भारतात देखील कादंबरीविरोधात निदर्शने करण्यात आली. कादंबरीला वाढता विरोध पाहून 1988 मध्ये भारतात या कादंबरीवर बंदी घालण्यात आली. या कांदबरीवर बंदी घालणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता.   


 14 फेब्रुवारी 1989 रोजी इराणचे तत्कालीन सर्वोच्च धर्मगुरू आयोतुल्लाह खोमेनी यांनी सलमान रश्दी यांना ठार मारण्याचा फतवा काढला होता. तेसच  "जगातील मुसलमानांनी या पुस्तकाच्या लेखकाला आणि प्रकाशकांना लवकरात लवकर संपवावं ” ज्यामुळं  यापुढे कोणीही इस्लामच्या पवित्र मूल्यांचा अपमान करण्याची हिंमत करणार नाही, असं आवाहन खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना  केलं होतं. सलमान रश्दी यांच्या या कादंबरीतून ईशनिंदा केल्याचं या धर्मगुरूंचं म्हणणं होतं. त्यामुळेच त्यांनी सलमान यांना ठार करण्याचा फतवा काढला होता. 


सलमान रश्दी यांचा जन्म  19 जून 1947 रोजी मुंबईत झाला. ते 14 वर्षांचे असताना त्यांना इंग्लंडमधील रग्बी स्कूल येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. सलमान यांनी केंब्रिज विद्यापीठात इतिहास या विषयात पदवी मिळवली. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकरलं आणि ते तेथेच स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलं.  त्यासाठी त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं. परंतु, त्यांच्या पाचव्या 'सॅटेनिक व्हर्सेस' या कादंबरीमुळे मोठा वाद निर्माण झाला आणि त्यांचं सार्वजनिक जीव धोक्यात आलं.