नवी दिल्लीः पर्यटनस्थळी सेल्फी घेताना जीव जाण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात समोर आले आहेत. केंद्र सरकारने या प्रकाराला आळा घालण्यासाठी देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर 'सेल्फी डेंजर झोन' तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय सांस्कृतीक आणि पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. पर्यटनस्थळांवर सेल्फी काढताना जीव जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सरकारने पर्यटनस्थळांवर 'सेल्फी डेंजर झोन' तयार करण्याचे राज्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
सेल्फीमुळे सर्वाधिक मृत्यू भारतात
महेश शर्मा यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून पर्यटन स्थळांवर 'सेल्फी डेंजर झोन' तयार करुन तशा सूचना करण्याचे निर्देश दिले आहेत. या 'सेल्फी डेंजर झोन'वर सीसीटीव्ही लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाला हा विषय गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
पर्यटनस्थळी सेल्फी घेताना मृत्यू होण्याचं सर्वाधिक प्रमाण भारतात असल्याचं दिसून आलं आहे. अहवालानुसार सेल्फी घेताना जगभरात 27 मृत्यू झाले आहेत. त्यातील सर्वाधिक 15 मृत्यू भारतात झाले आहेत, अशी माहिती महेश शर्मा यांनी दिली.