चेन्नई : देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा चेन्नईत पडला आहे. चालत्या ट्रेनमधून सुमारे 5 कोटी 75 लाख रुपये दरोडेखोरांनी लंपास केले आहेत. धक्कादायक म्हणजे चालत्या ट्रेनच्या छताला भगदाड पाडून दरोडा टाकल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडूतील सलेममध्ये ही दरोड्याची घटना घडली.


 

सलेम-चेन्नई एक्स्प्रेसमधून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पैसे नेले जात होते. या ट्रेनमध्ये 226 बॉक्समध्ये तब्बल 340 कोटी रुपयांची रोख रक्कम होती. यापैकी दोन बॉक्स दरोडेखोरांनी लंपास केल्याचं निदर्शनास आलं आहे.



रेल्वे पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी एम रामासुब्रमनी यांनी सांगितले की, “या दरोड्याप्रकरणी आम्हाला काही धागेदोरे सापडले आहेत. मात्र, ते आताच जाहीर करु शकत नाही. शिवाय, किती रुपयांचा दरोडा पडला आहे, याबाबतही अद्याप ठोस माहिती नाही. सध्या पैशांची मोजणी सुरु आहे. त्यामुळे या क्षणी अधिकृतपणे काही माहिती देऊ शकत नाही. मात्र, जवळपास 5 कोटी रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली असण्याची शक्यता आहे.”

 

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, एवढी मोठी रक्कम अर्थातच सुरक्षारक्षकांच्या फौजफाट्यात नेली जात होती. विशेष म्हणजे पोलीस उपायुक्त या सुरक्षारक्षकांचं नेतृत्त्व करत होते. मात्र, तरीही दरोडेखोरांनी 5 कोटी रुपये एवढ्या भल्यामोठ्या रकमेचा दरोडा टाकला.