Sahara India Pariwar Founder Subrata Roy: सहारा इंडियाचे (Sahara India Pariwar) संस्थापक सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचं वयाच्या 75 व्या वर्षी 14 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झालं. मुंबईतील (Mumbai News) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहारा समूहानं (Sahara Group) एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, सुब्रत रॉय यांचं मंगळवारी रात्री 10.30 वाजता कार्डियाक अरेस्टमुळे निधन झालं. त्यांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीजसारख्या आजारांनी ग्रासलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती, त्यामुळे त्यांना 12 नोव्हेंबर रोजी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया जिल्ह्यात झाला. भारतातील उद्योजकांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे, सुब्रत रॉय. त्यांनी फायनान्स, रिअल इस्टेट, मीडिया आणि हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांमध्ये आपलं एक विशाल साम्राज्य उभं केलं. सुब्रत रॉय यांनी 1978 मध्ये सहारा इंडिया परिवार समूहाची स्थापना केली.
सहारा, म्हणजे हिंदीत मदत, रिक्षाचालक, कपडे धुणारे आणि टायर दुरुस्त करणार्यांकडून दररोज 20 रुपयांची अल्प रक्कम गोळा करते. सहारा भारतीय हॉकी संघालाचे प्रायोजक (Sponsors) आहेत आणि फोर्स इंडिया या फॉर्म्युला वन रेसिंग संघातही त्यांचा हिस्सा आहे.
सुब्रत रॉय यांचा प्रवास गोरखपूरपासून सुरू
सुब्रत रॉय यांचा प्रवास गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या अभ्यासानं सुरू झाला. 1976 मध्ये, संघर्ष करत असलेली चिटफंड कंपनी सहारा फायनान्स ताब्यात घेण्यापूर्वी त्यांनी गोरखपूरमध्ये व्यवसायात आपलं पाऊल टाकलं. 1978 पर्यंत, त्यांनी त्याचं रूपांतर सहारा इंडिया परिवारात केलं, जे पुढे भारतातील सर्वात मोठ्या बिजनेस ग्रुप्सपैकी एक बनले.
रॉय यांच्या नेतृत्वाखाली सहारानं अनेक व्यवसायांमध्ये विस्तार केला. समूहानं 1992 मध्ये राष्ट्रीय सहारा हे हिंदी भाषेतील वृत्तपत्र सुरू केलं, 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात पुण्याजवळील महत्त्वाकांक्षी अॅम्बी व्हॅली सिटी प्रकल्प सुरू केला आणि सहारा टीव्हीसह दूरदर्शन क्षेत्रात प्रवेश केला, ज्याचं नंतर सहारा वन असं नामकरण झालं. 2000 च्या दशकात, सहारानं लंडनचे ग्रोसवेनर हाऊस हॉटेल आणि न्यूयॉर्क सिटीचं प्लाझा हॉटेल यांसारख्या प्रतिष्ठित मालमत्तांचे संपादन करून आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं अस्तित्व निर्माण केलं.
सहारा इंडिया परिवाराला एकेकाळी टाइम पत्रिकानं भारतीय रेल्वेनंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी रोजगार देणारी कंपनी म्हणून संबोधलं होतं. सुमारे 12 लाख कर्मचारी सहारा इंडिया परिवारात काम करत होते. समूहानं 9 कोटींहून अधिक गुंतवणूकदार असल्याचा दावा केला आहे, जे भारतीय कुटुंबांच्या महत्त्वपूर्ण भागाचं प्रतिनिधित्व करतात.
...जेव्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सुब्रत रॉय, अटकही झालेली
व्यवसायाच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या रॉय काही वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. एवढंच नाहीतर त्यांना अटकही झाली होती. 2014 मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सोबतच्या वादाच्या संदर्भात न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल सुब्रत रॉय यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे एक प्रदीर्घ कायदेशीर लढाई झाली, ज्यामध्ये रॉय यांनी काही काळ तिहार कारागृहातही घालवला आहे आणि नंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं. हे संपूर्ण प्रकरण सहाराच्या गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये परत करण्याच्या सेबीच्या मागणीचं होतं. सर्वोच्च न्यायालयानं यासाठी सहारा-सेबी रिफंड खातंही स्थापन केलं आहे.
सेबीची कारवाई आणि सहाराला ग्रहण
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सोबत दीर्घ कायदेशीर लढाईनंतर गुंतवणूकदारांविरुद्ध कथित फसवणूक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहारा प्रमुखांना त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांसह तुरुंगात टाकण्यात आले. 4 मार्च 2014 रोजी त्याची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. रॉय हे पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते. सुब्रत रॉय यांना व्याजासह गुंतवणूकदारांना 20,000 कोटी रुपये परत करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडे भारतात आणि परदेशात अनेक स्थावर मालमत्ता आहेत.
सुब्रत रॉय यांच्यावर त्यांच्या गुंतवणूकदारांनी दिलेले पैसे परत न केल्याचा आरोप होता. यामुळे SEBI ने त्याच्यावर कारवाई केली आणि 20 दशलक्ष डॉलर्सचा परतावा हा त्यांच्यासमोर अडचणीचा ठरला. यानंतर रॉय कुटुंबासाठी अनेक संकटांची मालिका सुरू झाली. रॉय यांना तुरुंगात जावे लागले आणि त्यांच्या व्यवसायालाही फटका बसला.
व्यवसायातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार
रॉय यांच्या कायदेशीर अडचणींचा व्यवसाय जगतात त्यांच्या योगदानावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत, ज्यात पूर्व लंडन विद्यापीठाकडून व्यवसाय नेतृत्वाची मानद डॉक्टरेट आणि लंडनमधील पॉवरब्रँड्स हॉल ऑफ फेम अवॉर्ड्समध्ये बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार यांचा समावेश आहे. इंडिया टुडेच्या भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीतही त्यांचा नियमितपणे समावेश होता.