नवी मुंबई : अँटिलिया प्रकरणी परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. रविशंकर यांनी ठाकरे सरकारला थेट सवाल विचारला असून ते म्हणाले की, सचिन वाझे कोणाच्या दबावात आले? शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या?
पत्रकार परिषदेत बोलताना रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "भ्रष्ट्राचाराचं प्रकरण नाही, हे ऑपरेशन लूट आहे. ते म्हणाले की, खंडणी घेणं हा गुन्हा आहे आणि जर याप्रकरणी शरद पवार यांना माहिती दिली जात आहे तर प्रश्न हा उपस्थित होतोय की, शरद पवार जर सरकारमध्ये नाहीत, तर मग त्यांना कोणत्या आधारावर माहिती दिली जात आहे. तसेच आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की, शरद पवार यांनी या प्रकरणासंदर्भात आपल्या स्तरावर कोणती कारवाई केली?"
शरद पवारांच्या शांततेमुळे प्रश्न उपस्थित
रवीशंकर म्हणाले की, "शरद पवारांच्या शांततेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचसोबत उद्धव ठाकरेही शांत आहेत. सचिन वाझे यांची पात्रता एएसआयची असूनही त्यांना क्राईम सीआयजीचा चार्ज देण्यात आला आहे. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "एकीकडे मुख्यमंत्री सचिन वाझे यांना पाठीशी घालतात, तर दुसरीकडे होम मिनिस्टर म्हणतात, मला 100 कोटी आणून द्या. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्यानं आणि इमानदारीनं चौकशी होणं गरजेचं आहे. तसेच याप्रकरणाची स्वतंत्र एजन्सीकडून चौकशी होणं गरजेचं आहे, कारण यामध्ये शरद पवार, मुंबई पोलीसांची भूमिका समोर येणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनाही अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील."
सचिन वाझे यांच्याकडून आणखी किती वाईच कामं करुन घेतली
रविशंकर प्रसाद म्हणाले की, "याप्रकरणी एक प्रश्न आणखी उपस्थित होतो की, सचिन वाझे यांच्याकडून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आणखी किती वाईट काणं करुन घेण्यात आली आहेत. मी असं म्हणतोय कारण एका इंस्पेक्टरला मुख्यमंत्री पाठीशी घालत आहे, असं मी देशात कुठेच पाहिलं नाही. अखेर सचिन वाझे यांना वाचवण्यासाठी कारण काय होतं. सचिन वाझे यांच्या पोटात अशी कोणती गुपितं लपलेली आहेत. या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. एक इंस्पेक्टर अनेक वर्षांपर्यंत सस्पेंड राहिल्यानंतर शिवसेनेत प्रवेश करतो. त्यानंतर अनेक पक्षांची कामं करतो. त्यामुळे आम्हाला शंका आहे की, संपूर्ण महाराष्ट्र सरकार सचिन वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे."
गृहमंत्री पक्षासाठी वसुली करत होते की, सरकारसाठी?
रविशंकर प्रसाद म्हणाले की, "गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत. 100 कोटी रुपये गोळा करण्यासंदर्भात सांगितल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अशातच प्रश्न हा उपस्थित होतोय की, अनिल देशमुख वसुली स्वतःसाठी करत होते की, पक्षासाठी? की उद्धव ठाकरे सरकारसाठी करत होते?" पुढे बोलताना ते म्हणाले की, "जर 100 कोटी रुपयांचं टार्गेट मुंबईसाठी होतं, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सांगावं की, संपूर्ण महाराष्ट्रातून किती रुपयांचं टार्गेट होतं. याला भ्रष्ट्राचार म्हणत नाही, याला लूट म्हणतात."
तुम्ही तर बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहात ना?
रविशंकर प्रसाद उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, "तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात ना, ज्यांनी जय महाराष्ट्र शब्द सर्वांपर्यंत पोहोचवला होता. आपल्या खुर्चीसाठी आपण अप्रामाणिकपणाचे सरकार स्थापन केले. आता तुम्ही तुमच्या वडिलांसाठी सन्मानाला ठेच पोहोचवत आहात. 'जय महाराष्ट्र' जिथे तुम्ही मुख्यमंत्री आहात, तिथे कोट्यवधी रुपयांची लूट होत आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sharad Pawar | गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ : शरद पवार
- परमबीर सिंह यांचं पत्र आताच का? यासह 'या' मुद्यांमुळं पत्रावर प्रश्नचिन्ह
- उद्धवजी, शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत : चंद्रकांत पाटील