पुणे : शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत.  प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर दबाव निर्माण करत आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते. चंद्रकात पाटील म्हणाले की, संजय राठोडांचा राजीनामा होतो आणि मुंडेंचा होत नाही. वाझेंना निलंबित केलं जातं देशमुखांना वाचवलं जातं. सरकारची प्रतिमा मुंडेंमुळं, देशमुखांमुळं डागाळली जात नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला. 


पाटील म्हणाले की,  परमबीर सिंग बोलले आहेत. अजून वाझे बोलायचे आहेत, वाझेही बोलतील. वाझे किती दिवस चूप बसणार?. उद्धव ठाकरे आमचे जुने मित्र आहेत.  राठोड प्रकरणावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचा राजीनामा घेतला. मग इतर प्रकरणावर ते गप्प का? सरकारचे पाय कुठे एकमेकांमध्ये अडकले आहेत? असा सवाल त्यांनी केला. डेलकरचा मुद्दा उगाच काढला जातोय, डेलकरचा मुद्दा इथला नाहीच, त्यांच्याबाबत आपल्याला इथं कारवाई करता येत नाही. त्या विषयाची चौकशी करा, आम्ही नाही म्हणत नाहीत, असंही ते म्हणाले. खोटं बोलण्याचा कळस चालला आहे. अनैतिकतेचा कळस चालला आहे, असं ते म्हणाले. 


ते म्हणाले की,  महाविकास आघाडीचे सगळे एका माळेचे मणी आहेत. ठाकरे सरकारला इशारा आहे, रोज नवी गोष्ट बाहेर येणार आहे. मी दोन दिवसांपूर्वीच म्हटलं होतं दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. त्यातील एक अनिल देशमुखांचा राजीनामा आज झाला पाहिजे. आणखी एक मंत्री जे गृह विभागात हस्तक्षेप करत होते. त्यांचाही तुम्हाला राजीनामा घ्यावा लागेल, मला नावं घ्यायला लावू नका, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सगळं माहिती असतं, असं ते म्हणाले. येत्या आठवड्यात राष्ट्रपतींना राज्यपालांना रिपोर्ट द्यावा लागेल.  राष्ट्रपती राजवट या ठिकाणी आणली पाहिजे, हा संघर्ष आता केवळ भारतीय जनता पार्टी पुरता मर्यादित राहिला नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आठवडाभरात मुंबईकडे येतील, असंही ते म्हणाले.  


अनिल देशमुख आरोप फेटाळत असतील तर त्यांनी परमबीर सिंहांना आत घेऊन चौकशी करावी, असं ते म्हणाले. वाझेंच्या स्टेटमेंटमध्ये नाव येतील म्हणून तुम्ही त्यांना पदावरुन काढलं. त्याआधी बरं चाललं होतं, हफ्ते, वाटे बरोबर पोहोचत होते. आता तुम्हाला परमबीर सिंह खोट बोलत आहेत असं वाटतंय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


'100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवारांना ठाऊक!'
चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत, ते अतिशय धक्कादायक आणि निंदनीय आहे. आता हे स्पष्ट आहे की ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे, असं त्यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिना 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे. पोलिसांना वसूली करायला लावणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 


त्यांनी म्हटलं आहे की, ठाकरे सरकार हे पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेले आहे. ठाकरे सरकारने कितीही साळसूदपणाचा आव आणला तरीही आता ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचा खुलेआम पर्दाफाश झाला आहे. आता केवळ अनिल देशमुख यांनी राजीनामा न देता संपूर्ण ठाकरे सरकारने पायउतार व्हावे. अनिल देशमुख यांची 100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार सर्वांना ठाऊक होती, परंतु सर्व गप्प होते, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राची अशी बदनामी करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा आजिबात अधिकार नाही. जर थोडीही लाज शिल्लक असेल तर ठाकरे सरकारने त्वरित राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेची सार्वजनिक स्वरुपात माफी मागावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.