नवी दिल्ली : काँग्रेसला मध्य प्रदेशनंतर राजस्थानमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, राजस्थानमधील काँग्रेसचे मोठे नेते सचिन पायलट आज भाजप पक्षात प्रवेश करण्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करतील. काँग्रेस, सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यात अपयशी ठरल्यामुळे सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.


राजस्थानमधल्या या राजकीय घडामोडीदरम्यानच रात्री अडीच वाजता मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. आमच्याकडे 109 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी या पत्रकार परिषदेत केला.


30 आमदारांचे समर्थन असल्याचा पायलट यांचा दावा
माझ्याकडे 30 आमदाराचं समर्थन असून राजस्थानचे अशोक गहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचे काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले. कोणत्या 30 आमदारांचे समर्थन आहे, हे मात्र समजू शकले नाही. दुसरीकडे काँग्रेस सूत्रांनी रविवारी रात्री अशोक गहलोत यांच्या बैठकीत 90 आमदारांची उपस्थिती असल्याचा दावा केला आहे.


Rajasthan Political Crisis | अशोक गेहलोत सरकार अल्पमतात, 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा सचिन पायलट यांचा दावा


काँग्रेस आमदारांची आज बैठक
आज म्हणजे सोमवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी साडेदहा वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. विशेष म्हणजे या बैठकीला दिल्लीहून निरीक्षकही येणार आहेत. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नाहीत. मुख्यमंत्री गहलोत यांच्यासोबत यापुढे काम करणे अवघड असल्याचे पायलट यांच्या निकटवर्तीय यांनी सांगितले.


दोन्ही गटाकडून वेगवेगळे दावे
एककडे माझ्याकडे 30 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा सचिन पायलट करत आहेत. तर दुसरीकडे अशोक गहलोत यांच्या गटात आमच्या संपर्कातही भाजपचे आमदार असल्याचा दावा काँग्रेस आमदार राजेंद्र गुड्डू यांनी केला आहे. ते म्हणाले की, "जितके आमदार जातील त्यापेक्षा जास्त भाजपचे आमदार आणू." त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचेही ते म्हणाले.


Rajasthan political crisis | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत-सचिन पायलट संघर्ष?