जयपूर : राजस्थानच्या सत्तासंघर्षात एक मोठी घडामोड घडली आहे. राजस्थानमधील अशोक गहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन पायलट यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात 30 आमदारांचं त्यांना समर्थन असल्याचंही म्हटलं आहे. तसेच सोमवारी होणाऱ्या काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. त्यामुळे राजस्थानमधील सरकार अल्पमतात असून सत्तांतर होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र सचिन पायलट यांच्या सोबत असलेले 30 आमदार कोण आहेत याची माहिती त्यांनी दिलेली नाही.


अशोक गेहलोत यांच्या गटातील एका आमदाराने सचिन पायलट यांनी केलेल्या दाव्याचं खंडण केलं आहे. सचिन पायलट यांच्यासोबत 30 आमदार नाहीत. राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यानही अशी चर्चा होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला 123 मतं मिळाली होती. आजही तीच स्थिती आहे. अशोक गेहलोत यांना काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे, असं गेहलोत यांच्या गटातील आमदाराने सांगितलं.


काँग्रेसचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी म्हटलं. तसेच सचिन पायलट यांच्यासोबत नेमके कोण आमदार आहेत, याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.


सचिन पायलट ज्योतिरादित्य यांच्या वाटेवर? मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानातही सत्तांतर होणार?


आज अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसचे एकूण 90 आमदार उपस्थित होते, अशी माहिती गेहलोत यांच्या गटातील नेत्यांनी दिली. तसेच सोमवारी जी काँग्रेस विधीमंडळ गटाची बैठक होणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्हीप जारी केला आहे.


भाजपचे आमदार संपर्कात असल्याचा दावा


बैठकीनंतर बोलताना आमदार राजेंद्र गुड्डू यांनी दावा केली की, भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. अशोक गेहलोत यांचं सरकार बहुमतात आहे. आम्ही जितके आमचे आमदार गमावू, त्याहून अधिक भाजपचे आमदार काँग्रेसमध्ये सामील होतील, असं राजेंद्र गुड्डू यांनी म्हटलं.


Rajasthan Politics ज्योतिरादित्यंनंतर सचिन पायलटही भाजपच्या वाटेवर? सचिन पायलटांची नाराजी दूर होणार?