S Jaishankar Meets Tariq Ahmad: भारत (India) दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे परराष्ट्र राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार राज्यमंत्री लॉर्ड तारिक अहमद (Loard Tariq Ahmad) यांनी सोमवारी (29 मे) परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांची भेट घेतली. 27 मे ते 31 मे दरम्यान लॉर्ड तारिक अहमद भारत दौऱ्यावर होते. यावेळी भारत आणि ब्रिटनमधील संबंध मजबूत करण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली.


जयशंकर यांनी भारत भेटीवर आलेल्या तारिक अहमद यांना ब्रिटनमधील भारताच्या राजनैतिक मिशनची सुरक्षा सुनिश्चित करण्यास आणि लोकशाही स्वातंत्र्याचा गैरवापर थांबविण्यास सांगितलं. कॉमनवेल्थ आणि विकास राज्यमंत्री लॉर्ड अहमद यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान जयशंकर यांनी लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांकडून केलेल्या तोडफोडीचा मुद्दाही उपस्थित केला. मार्चमधील या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं ब्रिटिश प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर लंडनमधील भारतीय मिशनवर झालेल्या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला होता.


परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लॉर्ड तारिक अहमद यांच्या भेटीनंतर ट्वीट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्वीट केलं आहे की, बैठकीत FTA, दक्षिण आशिया ते इंडो-पॅसिफिक आणि G20 यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. UK मधील आमच्या राजनैतिक मिशनची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आणि लोकशाही स्वातंत्र्याचा गैरवापर रोखण्याच्या दायित्वाची आठवण करून दिली.






भारत यूकेचा 12वा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार 


जयशंकर म्हणाले की, त्यांनी दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांशी मुक्त व्यापार करार आणि दक्षिण आशियापासून ते इंडो-पॅसिफिक आणि जी20 पर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मुक्त व्यापार करार (FTA) संदर्भात भारत आणि ब्रिटनमध्ये आतापर्यंत चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत.


भारत आणि यूके गेल्या वर्षी जानेवारीपासून एफटीएसाठी वाटाघाटी करत आहेत. सर्वसमावेशक करार एकत्रित करणं हेच त्याचं उद्दिष्ट आहे. यूके सरकारच्या आकडेवारीनुसार, भारत 2022 मध्ये 12 वा सर्वात मोठा व्यापार भागीदार होता, जो यूकेच्या एकूण व्यापाराच्या 2.1 टक्के आहे. दरम्यान, भारत आणि यूके गेल्या वर्षी जानेवारीपासून एका सर्वसमावेशक कराराच्या दिशेनं एफटीएवर वाटाघाटी करत आहेत, ज्यामुळे 2022 मध्ये द्विपक्षीय व्यापार संबंध लक्षणीयरीत्या 34 अब्ज ब्रिटिश पौंडांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.