Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यात आता यूक्रेनमधील मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) दिले आहेत. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसने (MUHS) युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि राज्यात मायदेशी परतणाऱ्या विद्यार्थ्यांचा तपशील मागवणारे परिपत्रक जारी केले.


दरम्यान, यावर अनेक विद्यार्थ्यांनी अशी माहिती संकलित करण्यामागील कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर केवळ माहिती एकत्र करण्यासाठी हा डेटा मागवला जात असल्याचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने म्हटले आहे. युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील किती विद्यार्थी शिकत आहेत याच्या नोंदी अद्ययावत करण्याचा हा अभ्यास असल्याचा दावा एमयूएचएसने (MUHS) केला आहे.


एमयूएचएसचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी बुधवारी परिपत्रक जारी केले आहे. त्यांनी सांगितले की हे केवळ युक्रेनमधील मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा डेटा एकत्र करण्यासाठी आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी एका भाषणात सांगितले होते की, युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरती मदत देण्याचे मार्ग राज्य सरकार पाहत आहे. या विधानामुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला होता की सरकार परत आलेल्या विद्यार्थ्यांना राज्य महाविद्यालयांमध्ये सामावून घेईल.


युक्रेनमधील विद्यार्थ्यांना अशाप्रकारे दिलासा मिळण्याच्या शक्यतेने इतर देशांत शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. एका विद्यार्थ्याने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याची विद्यापिठाची योजना नेमकी कशी आहे याबद्दल अधिक तपशील देणे गरजेच आहे. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी कोविड-19 महामारीच्या काळात भारतात परतले होते आणि तेव्हापासून ते येथेच अडकून पडले आहेत. जर सरकारने मदतीचा हात पुढे केला तर तो सर्वांसाठी असावा.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha