मुंबई:रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम (RTGS) सुविधाच्या नियमांत 14 डिसेंबरपासून बदल होणार आहेत. रात्री 12.30 वाजल्यापासून आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास RTGS सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारची सुविधा 24 तास आणि सातही दिवस उपलब्ध करुन देणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश होणार आहे.


या सुविधेचा वापर करुन ग्राहक आता वर्षातील 364 दिवस व्यवहार करु शकणार आहेत. सध्या RTGS च्या माध्यमातून महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा अपवाद वगळता आठवड्याती इतर दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैशाचे व्यवहार करता येऊ शकत होते. सध्या RTGS वापर करुन देशातील 237 बॅंकांच्या माध्यमातून रोज 6.35 लाख व्यवहार होतात. याची किंमत 4.17 लाख कोटी रुपये इतकी आहे.


ऑनलाइन आणि बँकेच्या माध्यमातून व्यवहार शक्य
RTGS च्या सुविधेचा वापर आता ऑनलाइन आणि बॅंकेच्या माध्यमातून केला जाऊ शकणार आहे. यामुळे पैशाचं ट्रान्सफर तात्काळ शक्य होणार आहे. RTGS चा वापर मोठ्या किंमतीच्या व्यवहारांसाठी केला जातो. RTGS चा वापर करुन एका वेळी किमान दोन लाख रुपयांची ट्रान्सफर करावी लागते. त्याचवेळी जास्तीत जास्त किती रुपयांचा व्यवहार करावा याची मर्यादा वेगवेगळ्या बँकात वेगवेगळी आहे.


क्रॉस बॉर्डर पेमेंट्सदेखील सुलभ होण्याची शक्यता
भारतीय रिजर्व बँक (RBI) ने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलं होतं की डिसेंबर महिन्यापासून RTGS सुविधा वर्षातील 365 दिवसही उपलब्ध होणार आहे. आरबीआयच्या मते, आठवड्यातील सर्व दिवसात RTGS ची सुविधा उपलब्ध झाल्याने वित्तीय बाजारातील आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट्सचे व्यवहार अधिक सुलभ होतील.


महत्वाच्या बातम्या: