नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर 500 रुपयांच्या नोटांची छपाई करण्यासाठी पाच हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती सरकारकडून लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी ही माहिती दिली.

8 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या एकूण दीड कोटींहून अधिक नोटांची छपाई करण्यात आली. या छपाईसाठी 4 हजार 968 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला असल्याचं पी.राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितलं.

तसेच आत्तापर्यंत 2000 रुपयांच्या 365.4 कोटी रुपयांच्या नोटांची छपाई झाली असून, त्यासाठी एकूण खर्च 1239. 6 कोटी रुपये आला. तर 200 रुपयांच्या 178 कोटी किमतीच्या नोटा छापल्या. त्यावर सरकारला 522.83 कोटी खर्च करावा लागला.

दुसरीकडे 2016-17 या आर्थिक वर्षात आरबीआयकडून सरकारला जो सरप्लस ट्रान्सफर करण्यात आला, त्यातही 35 हजार 217 कोटी रुपयांची घसरण पाहायला मिळाली. यापाठी मागे देखील नव्या नोटा छपाईतील खर्च असल्याचे सांगण्यात येतं.

दरम्यान, 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णयाची घोषणा केल्यानंतर, 99 टक्के नोटा या रिझर्व बँकेकडे परत आल्या होत्या. तर 30 जून 2017 पर्यंत 15.28 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत परत आल्याचं, राधाकृष्णन यांनी आणखी एका प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना सांगितलं.