नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आज (मंगळवार) ड्रायव्हरलेस मेट्रोला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चाचणीदरम्यान या मेट्रोला अपघात झाला. कालिंदी कुंज डेपोजवळ ही ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रॅकवरुन घसरली आणि थेट भिंत तोडून आरपार गेली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


तांत्रिक बिघाडमुळे वेळीच ब्रेक लागू शकला नाही. म्हणून हा अपघात झाल्याचं सुरुवातीच्या चौकशीत समोर आलं आहे.

25 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

या मेट्रो लाइनचं 25 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. मात्र, त्याआधीच हा अपघात झाल्यानं आता या उद्घाटन सोहळ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी दिल्ली मेट्रोला 15 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे या मेट्रो लाइनच्या उद्घाटनाचा मुहूर्त देखील त्याच दिवशीचा ठरवण्यात आला आहे.

दिल्लीतल्या बॉटेनिकल गार्डन ते कालकाजीपर्यंत ड्रायव्हरलेस मेट्रो धावणार आहे.