नवी दिल्ली : दोन विद्यार्थ्यांनी भोसकून हत्या केलेल्या दिल्लीतील शिक्षकाच्या कुटुंबीयांना सरकारने मदत जाहीर केली आहे. पीडित कुटुंबाला केजरीवाल सरकारतर्फे एक कोटी रुपये दिले जाणार आहेत.


शिक्षकाच्या हत्येप्रकरणी चौकशीचे आदेशही दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिले आहेत. मुकेश कुमार यांच्यावर दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी हल्ला केला होता. त्यानंतर अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांना होत असलेल्या त्रासाची भरपाई कधीच शक्य होणार नाही, मात्र तात्काळ मदत म्हणून त्यांना एक कोटी रुपये दिले जातील, असं सिसोदिया म्हणाले. सीमेवर लढणाऱ्या जवानाइतकंच शिक्षकाचं योगदानही मोलाचं असतं, त्यामुळे शिक्षकांप्रती आदरातून आमच्या सरकारने हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.

मुकेशकुमार हे नांगलोईतील सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. बारावीतील दोन विद्यार्थ्यांच्या कमी हजेरीमुळे मुकेश यांनी त्यांना निलंबित केलं होतं. त्यानंतर सोमवारी सर्व विद्यार्थ्यांच्या समोर आरोपींनी मुकेश यांना भोसकलं.