India China Clash: अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये (Arunachal Pradesh Tawang Sector) 9 डिसेंबर रोजी भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये (India China Clash) संघर्ष झाला. भारतीय जवानांनी (Indian Army) चिनी सैन्याच्या (China Army) घुसखोरीचा डाव हाणून पाडला. त्यानंतर देशाच्या सुरक्षितेच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या सगळ्या गदारोळात केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी तवांगमध्ये भारतीय जवानांची भेट घेतल्याचा फोटो शेअर केला होता. आता या फोटोवरून रिजिजू यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. किरण रिजिजू यांनी जुनाच फोटो ट्वीट केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. 
 
भारतीय जवानांनी चीनच्या घुसखोरीचा डाव उधळून लावल्याचे वृत्त घटनेच्या 3 दिवसानंतर समोर आले होते. देशाच्या सुरक्षितेच्या मुद्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेत भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर तवांग सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांची भेट घेतली असल्याचे सागंत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फोटो शेअर केला होता. मात्र, हा फोटो तीन वर्ष जुना असल्याचा दावा करण्यात आला आहे. 


युवक काँग्रेस अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी दोन्ही फोटो एकत्र ट्वीट करत उपरोधिक टीका केली आहे. वर्ष 2019 मधील फोटो 2022 मध्ये शेअर करत देशाच्या सीमा सुरक्षित असल्याचा विश्वास दिला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. दोन्ही फोटो रिजिजू यांच्या ट्वीटर हँडलवरून घेण्यात आले. 







अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्याने 9 डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा हा डाव हाणून पाडला. या वेळी दोन्ही बाजूने तीव्र संघर्ष झाला. या वेळी दोन्ही बाजूने झटापट आणि दगडफेक झाली असल्याचे वृत्त होते. या संघर्षात भारताचे काही जवान जखमी झाले. जखमी चिनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांपेक्षा जास्त आहे. सुमारे 300 सैनिकांसह चिनी पूर्ण तयारीनिशी आले होते, पण यासाठी भारतीय सैनिकही तयार होते. भारतीयांकडून प्रतिकार होईल, अशी अपेक्षा चीनला नव्हती. मात्र, भारतीय जवानांनी त्यांना माघारी धाडले.