कानपूर : पीएनबी घोटाळा ताजा असतानाच देशातील पेन बनवणारी मोठी कंपनी रोटोमॅकचाही 800 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आला आहे. सीबीआयने रोटोमॅकविरोधात गुन्हा दाखल केला असून छापेमारी सुरु केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. कानपूरमध्ये तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली.


घोटाळ्यांच्या आरोपांनंतर कंपनीचे मालक विक्रम कोठारी देशातून फरार झाल्याचं वृत्त होतं. मात्र रविवारी एका लग्न समारंभात ते दिसून आले. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह दिग्गज राजकीय नेते आणि उद्योगपती उपस्थित होते.

रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांनी सरकारी बँकांकडून जवळपास 800 कोटी रुपयांचं कर्ज एक वर्षापूर्वी घेतलं होतं. मात्र अजूनही ते भरलेलं नाही. कानपूरच्या टिळक नगरमध्ये विक्रम कोठारीचा आलिशान बंगला आहे, मात्र ते सध्या बंगल्यात राहत नाहीत. तर पनकी दादा नगर भागात कारखाना आहे, जो बंद आहे. कानपूरच्या माल रोडच्या सिटी सेंटरमध्ये रोटोमॅकचं कार्यालय आहे, तेही सध्या बंद अवस्थेत आहे.

''रोटोमॅकला युनियन बँकेने 485 कोटींचं कर्ज दिलेलं आहे आणि हे कर्ज वसूल करण्यासाठी कोठारींची जी संपत्ती बँकेकडे गहाण ठेवलेली आहे, ती विकली जाणार आहे,'' असं युनियन बँकेचे मॅनेजर पीके अवस्थी यांनी सांगितलं.

''विक्रम कोठारी यांच्याकडून 352 कोटींची वसुली करायची आहे. पैसा वसूल न झाल्यास ते अकाऊंट बुडीत कर्जामध्ये (एनपीए) जाईल. त्यांची जी जमीन बँकेकडे आहे, ती विकण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यातून पैसा वसूल केला जाईल,'' असं अलाहाबाद बँकेचे मॅनेजर राजेश यांनी सांगितलं.

बँक कोणत्याही व्यक्तीला कर्ज देते तेव्हा ते वसूल करण्यासाठी अनेकदा अडचणी येतात किंवा कर्जदार ते परत करण्यास असमर्थ ठरतात. त्यानंतर बँक त्यांना नोटीस पाठवते की कर्ज भरा किंवा तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यानंतरही रक्कम न भरल्यास संबंधित व्यक्तीचं खातं बुडीत कर्जामध्ये जातं.